आत्महत्या करतो म्हणून दमदाटी करणाऱ्या अकाउंटंटविरुद्ध गु्न्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST2021-07-25T04:20:42+5:302021-07-25T04:20:42+5:30
पोलीस सूत्रांनुसार एमआयडीसी चिंचोली येथील एका कंपनीत अकाउंट ऑफिसर म्हणून प्रकाश सदाशिव सावळे (रा. बाळे) हे काम पाहतात. ...

आत्महत्या करतो म्हणून दमदाटी करणाऱ्या अकाउंटंटविरुद्ध गु्न्हा
पोलीस सूत्रांनुसार एमआयडीसी चिंचोली येथील एका कंपनीत अकाउंट ऑफिसर म्हणून प्रकाश सदाशिव सावळे (रा. बाळे) हे काम पाहतात. २१ व २२ जुलै रोजी त्यांनी कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना ऑफिसची खिडकी बंद करण्याच्या कारणावरून शिवीगाळी केली. गेटपास न घेता तसेच निघून गेले होते. या कारणास्तव त्यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन त्यांना २३ जुलै रोजी कंपनीमधून निलंबित केल्याचा आदेश काढला होता. परंतु त्यांनी तो आदेश न स्वीकारता कंपनीमधून तसेच निघून गेले होते. त्यामुळे कंपनीच्या वरिष्ठांनी सावळे यांना गेटच्या आतमध्ये घ्यायचे नाही, असा आदेश काढला होता.
दरम्यान, २४ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान ते कंपनीच्या गेटवर जात असताना सिक्युरिटी गार्डनी त्यांना अडवले. त्यामुळे त्यांनी दगड उचलून सिक्युरिटी गार्डला फेकून मारला. मात्र तो दगड ट्रक ड्रायव्हर यल्लाप्पा पुजारी यांना लागला. तसेच पुढे जाऊन त्यांनी जनरल मॅनेजरच्या केबिनमध्ये प्रवेश करून ‘तुम्ही मला निलंबित कसे काय केले? मी तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो,’ अशी धमकी देऊन दमदाटी करून त्यांच्याशी हुज्जत घातल्याची फिर्याद सुरक्षारक्षक अधिकारी जयानंद मलकारी कांबळे (रा. सैफूल, सोलापूर) यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस फौजदार सुनील चवरे हे करीत आहेत.