माकपकडून सहा प्रभागांसाठी ५० जणांची यादी तयार
By Admin | Updated: January 24, 2017 19:29 IST2017-01-24T19:29:38+5:302017-01-24T19:29:38+5:30
माकपकडून सहा प्रभागांसाठी ५० जणांची यादी तयार

माकपकडून सहा प्रभागांसाठी ५० जणांची यादी तयार
माकपकडून सहा प्रभागांसाठी ५० जणांची यादी तयार
विलास जळकोटकर - सोलापूर
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. माकप कार्यालयातही उमेदवारांची रेलचेल सुरु झाली असून, गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाच्या वतीने ज्या प्रभागात प्राबल्य आहे तेथे चाचपणी करुन ५० जणांची यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्षांना शह देण्यासाठी आघाडीची प्रक्रिया सुरु झाली असून, याला सकारात्मक यश आल्यास माकप जागा सोडण्यास तयार असल्याचे संकेत पक्षाचे जिल्हा सचिव एम. एच. शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
माकपमधून अन्य पक्षांप्रमाणे इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेण्याची प्रक्रिया नसते. पक्षाच्या वतीने गेल्या सहा महिन्यांपासून ज्या प्रभागात पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सक्रिय लोकांची यादी तयार करण्यात येते. त्याप्रमाणे पक्षाने अशा ५० जणांची यादी तयार केली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी ९, १३, १४, १६, १७, १८ या प्रभागांची निवड करण्यात आली आहे. या सहा प्रभागातून ५० जणांच्या यादीतून २४ जणांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे. यासाठी सर्व प्रभागांमध्ये बैठका घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात लढायचे असेल तर आघाडी होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने युतीसाठी चर्चा, बैठका सुरु झाल्या आहेत. या आघाडीमध्ये प्रामुख्याने समाजवादी पार्टी, जनता दल, भारिप बहुजन महासंघ, लेबर पार्टी, आम आदमी, अन्य समविचारी पक्ष आणि माकपचा समावेश असणार आहे
-----------------
जनतेला पर्याय हवाय
४शहरातील जनता काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-सेनेला कंटाळली आहे. त्यांना पर्याय हवा आहे. मूलभूत समस्या सोडवल्या जाव्यात, किमान विकास व्हावा, या बाबींच्या पूर्ततेसाठी तिसरी आघाडी तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जबाबदार आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली दीड लाख लोकांसाठी देखावा केला जात असून, हद्दवाढमधील लोकांकडे दुर्लक्ष होत असून, जनतेला सक्षम पर्याय देण्यासाठी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरेल, अशी अपेक्षा भाकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मास्तर यांनी स्पष्ट केले.
----------------
सोलापूर महापालिकेत निवडणुकीनंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आघाडीचा एक दबाव गट असेल. त्या प्रमाणात उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- अॅड. एम. एच. शेख,
माकप, जिल्हा सचिव