कोरोनाचा वाढला कहर; लस घेण्यासाठी नागरिकांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST2021-04-21T04:23:01+5:302021-04-21T04:23:01+5:30
मास्कचा योग्यप्रकारे वापर न करणे, कोरोनाबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या नियमाचे पालन नागरिकांकडून होत नाही. यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या ...

कोरोनाचा वाढला कहर; लस घेण्यासाठी नागरिकांची धडपड
मास्कचा योग्यप्रकारे वापर न करणे, कोरोनाबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या नियमाचे पालन नागरिकांकडून होत नाही. यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील अनेक खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील २६२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सोमवारी १४९, तर आजअखेर ११ हजार २८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ९ हजार ७७० रुग्ण बरे झाले आहेत, तर १२५९ जणांवर उपचार सुरू आहेत.
सध्या पंढरपुरातील सर्व रुग्णालयांतील बेड कोरोना रुग्णांमुळे फुल्ल झाले आहेत. त्याचबरोबर शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या प्रथमदर्शनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसींचे डोस देण्यात आले आहेत. यामधील काही लोकांनी पहिला डोस घेतला तर काहींचा दुसरा डोस राहिला आहे. अचानक कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटीदरम्यान कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचेदेखील प्रमाण जादा आहे. यामुळे कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू केली आहे. आरोग्य केंद्रात लस उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे.
गादेगाव (ता. पंढरपूर) येथील आरोग्य केंद्रावर १०० लस उपलब्ध झाल्या. मात्र लस घेण्यासाठी ४०० ते ५००च्या आसपास नागरिकांनी गर्दी केली. यावरून नागरिकांमध्ये कोरोनाबाबत अधिक भीती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
कोट ::::::::::::::::::::::::::
ज्या लोकांनी कोविन ॲपवर नोंद केली आहे. नगर परिषदेमार्फत गुगलवर फॉर्म भरले जातील. ग्रामीण भागात गावपातळीवर नोंद करावी. अशाच लोकांना कोरोना लस देताना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
- डॉ. एकनाथ बोधले, तालुका आरोग्य निरीक्षक, पंढरपूर.
कोट ::::::::::::::::::
आरोग्य केंद्रावर लस देण्याच्या ठिकाणी लस कमी मात्र नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे पोलीस बंदोबस्तात लस देण्यात येणार आहे.
- डॉ. अरविंद गिराम, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर
फोटो ::::::::::::::::
गादेगाव (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी झालेली गर्दी.