कोरोना संकट झेलत बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:29+5:302021-05-15T04:20:29+5:30

कोरोनाचा संसर्ग सध्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणात असताना मोठ्या हिमतीने शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. ...

Corona was in trouble and Baliraja started working | कोरोना संकट झेलत बळीराजा लागला कामाला

कोरोना संकट झेलत बळीराजा लागला कामाला

कोरोनाचा संसर्ग सध्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणात असताना मोठ्या हिमतीने शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना कोरोना रोगाने कमी भावात माल विकावा लागला. त्यात अवकाळी पाऊस, वादळ, गारपीठ यासारख्या आपत्तीला तोंड द्यावे लागले. आता पावसाळ्याच्या दिवस तोंडावर आले असून, खरिपाची पेरणीपूर्व मशागतीचे कामे सुरू झाली आहेत.

मजुरीचे दर वाढल्याने व बैलांचा अभाव असल्याने शेतकरी तांत्रिक शेतीकडे वळला आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणीची कामे कमी वेळात उरकून घेतली जात आहेत. गेल्यावर्षीपासून कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने पिकवलेला माल बाजारात कमी दराने विकला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही. मजुरीबरोबर डिझेलचे दर वाढल्याने नांगरटीच्या दरातही वाढ झाली आहे. नांगरणी ट्रॅक्टरने प्रतिएकर दीड हजार रुपये, शेतीची लेव्हल प्रतिएकर ७०० रुपये आहे. मजूर रोजगार ५०० रुपये आहे. या खर्चाचा ताळमेळ शेतकरी उसनवारी करून करत आहे.

------

समाधानकारक पावसाचा अंदाज

पावसाचे रोहिणी नक्षत्र यंदा २५ मेपासून सुरू होत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

----

कोरोनामुळे पिकवलेल्या मालाचे समाधानकारक पैसे मिळालेले नाहीत. शेतीत उत्पन्न कमी व खर्च जास्त असा प्रकार होत असून, शेतीच्या खर्चासाठी लागणारा पैसा कुठून उभा करावयाचा असा प्रश्न आहे. कोरोनामुळे सगळेच आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

- राजेंद्र मेरगळ, शेतकरी, हिवरवाडी

---

फोटो ओळी : पांडे येथे खरीप हंगामाची जमीन मशागत करताना शेतकरी.

---

Web Title: Corona was in trouble and Baliraja started working