सावळेश्वर येथून चालायचे बनावट सोनसाखळ्या गहाण ठेवण्याचे कारस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:15+5:302021-02-05T06:46:15+5:30
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मूळचे सोलापूरचे सोनार मारुती रेवणकर यांना सहा महिन्यांपूर्वी सावळेश्वरच्या पप्पू ऊर्फ दावल तांबोळी यांनी वेळोवेळी बनावट ...

सावळेश्वर येथून चालायचे बनावट सोनसाखळ्या गहाण ठेवण्याचे कारस्थान
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मूळचे सोलापूरचे सोनार मारुती रेवणकर यांना सहा महिन्यांपूर्वी सावळेश्वरच्या पप्पू ऊर्फ दावल तांबोळी यांनी वेळोवेळी बनावट सोन्याच्या साखळ्या देऊन सहा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली होती. याच दरम्यान २६ जानेवारी रोजी गावातल्या इस्माईल मणियार याने पुन्हा बनावट सोने देऊन मारुती रेवणकर यांची फसवणूक केली. त्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तातडीने मोहोळ पोलिसांशी संपर्क साधला आणि मोहोळ पोलिसांनी मणियार यास अटक केली.
मणियार यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने या टोळीचा प्रमुख सूत्रधार पिसेवाडीचा मनोज मधुकर बनगर असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी फौजदार संतोष इंगळे, पोलीस प्रवीण साठे यांचे पथक आटपाडीला रवाना केले. प्रजासत्ताक दिनादिवशीच या पथकाने मनोज बनकर याला ताब्यात घेतले. त्याने सावळेश्वर येथील बबलू पठाण याच्याशी ओळख झाली. त्यातूनच या सोन्याच्या विक्रीसंबंधी सोने गहाण ठेवण्याबाबत दोघांची एकमेकांशी चर्चा झाली. सावळेश्वर येथून हा उद्योग करण्याचा प्लॅन ठरला आणि मोठ्या प्रमाणात बँकांना गंडवण्याचा प्रकार समोर आला.
याप्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, पो. कॉ. प्रवीण साठे करीत आहेत.
-----
थेट दिल्लीशी कनेक्शन
दिल्लीतील सोन्याच्या साखळीवर होलमार्क देणाऱ्याशी संपर्क साधला. त्याच्यामार्फत सोन्याचे कोटिंग व होलमार्क असलेल्या सोन्याच्या बनावट साखळ्या दिल्लीहून पुण्यापर्यंत कुरिअरद्वारे मागवून पुण्यातून सावळेश्वर येथे आणून सावळेश्वरमधून या बनावट साखळ्या कोणत्या बँकेत , कोणत्या पतसंस्थेत, कोणत्या सोनाराकडे ठेवायच्या यासाठी एजंट नेमून त्या एजंटमार्फत हा उद्योग करत समोर आले.
----
एजंटांना मिळायचे दहा हजार रुपये
पोलिसांनी मोडनिंब येथे जाऊन भुताष्टेच्या बळी यादव (वय ५०) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. यावेळी त्याने साखळ्या ठेवलेल्या बँकांची नावे सांगितली आहेत. या बनावट साखळ्या गहाण ठेवण्यामागे प्रत्येक एजंटला १० हजार रुपये देत असल्याचे बळी यादवने सांगितले.
----
बँका, पतसंस्था अन् सोनारांकडे सोनसाखळ्या
या टोळीने मोहोळ येथील आयसीआयसीआय बँकेसह मोहोळ शहरातील पतसंस्था व सोनारांकाडेही काही प्रमाणत या बनावट साखळ्या ठेवल्या असल्याचे सांगितले आहे. याशिवाय सोलापूर येथील ॲक्सिस बँकेसह काही सोनाराकडे महिलांमार्फत या बनावट साखळ्या ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
----
आणखी दोघांची नावे निष्पन्न
याप्रकरणी इस्माईल मणियार, मुख्य सूत्रधार मधुकर बनकर, बळी आबा यादव या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांच्या चौकशीदरम्यान दावल तांबोळी व अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत.