काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; मात्र उपमहापौरांमुळे बिघाडी
By Admin | Updated: January 30, 2017 21:51 IST2017-01-30T21:51:49+5:302017-01-30T21:51:49+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; मात्र उपमहापौरांमुळे बिघाडी

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; मात्र उपमहापौरांमुळे बिघाडी
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; मात्र उपमहापौरांमुळे बिघाडी
सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या चर्चेनंतर महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच आघाडी करण्याचे ठरले खरे; मात्र जागा वाटपावेळी उपमहापौरांच्या हट्टामुळे एका प्रभागात आघाडीची बिघाडी झाली आहे. आघाडीमुळे काँग्रेसने महापौरांचा प्रभाग बदलला तर दोन माजी महापौरांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांचा हट्ट संपला नसल्याने समितीमधील सदस्यांची पंचाईत झाली आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप-सेनेचे आव्हान रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. जागा वाटपासाठी दोन्ही पक्षातील अध्यक्षांसह आठ जणांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितींच्या वारंवार बैठका झाल्या. पण जागा वाटपावरून पेच कायम राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी ३५ वरून ३0 पर्यंत खाली आली. पण काँग्रेसच्या सदस्यांनी संयमाने घेत विद्यमान नगरसेवकांना आहे तेथे ठेवत २६ म्हणत २८ जागांवर तयारी केली. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपमहापौर प्रवीण डोंगरे व नगरसेवक मनोहर सपाटे यांचा हट्ट कायम राहिला.
काँग्रेस समितीतील सदस्यांची माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी सोमवारी जवळपास सहा तास बैठक झाली. प्रभागनिहाय जागा वाटपाचा आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण प्रभाग ९, ७ व २२ मधील जागांचा तिढा कायम राहिला. प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्तू बंदपट्टे व मेघनाथ येमूल यांच्या उमेदवारीवर काँग्रेस समिती कायम राहिली. पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमहापौर प्रवीण डोंगरे अडून बसले. त्यामुळे या प्रभागात आघाडीची बिघाडी झाली. या ठिकाणी काँग्रेसचे ४ व राष्ट्रवादीचे ४ उमेदवार उभे करण्याचे ठरले. फक्त हा एक प्रभाग अपवाद वगळता इतर २५ प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार आहे.
प्रभाग ७ मध्ये सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे व शिक्षण मंडळ सभापती संकेत पिसे यांच्या कुटुंबातील महिला सदस्याला उमेदवारी देण्यावरून समितीतील सदस्य आग्रही होते. या ठिकाणी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मनोहर सपाटे यांना स्वीकृत करून त्यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्यावरून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू होता. हे कळताच सपाटे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कोल्हापूर, पुणे दौरा केला. या वाटाघाटी सुरू असतानाच अमोल शिंदे यांनी दुपारी काँग्रेसची साथ सोडत असल्याचा निरोप कळविला. या प्रभागातून सेनेतर्फे अमोल शिंदे, देवेंद्र कोठे, उत्तरा बरडे, वंदना पिसे यांची उमेदवारी फिक्स होणार अशी चर्चा आहे. तर आता राष्ट्रवादीतर्फे पद्माकर काळे, मनोहर सपाटे, स्वीकृत सदस्य दीपक राजगे व किरण पवार यांच्या कुटुंबातील महिलांना स्थान देण्याचे निश्चित झाले आहे.
उद्या होणार यादी जाहीर.......
दोन्ही समितीचे सदस्य आघाडीतील जागा वाटपाची यादी घेऊन मुंबईला गेले आहेत. ही यादी प्रदेश कार्यालय व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दिली जाईल. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ही यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. जगदंबा चौकात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
महापौर २२ ऐवजी २४ प्रभागातून...
विद्यमान महापौर सुशीला आबुटे यांचा प्रभाग २२ होता. पण राष्ट्रवादीचे नागेश जाधव व काँग्रेसच्या अश्विनी जाधव, पैगंबर शेख, मधुकर आठवले यांची नावे फिक्स असल्याने आबुटे यांना २४ मधून उमेदवारी देण्याचे ठरले आहे. या ठिकाणचे विद्यमान नगरसेवक व माजी महापौर आरिफ शेख यांना शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच माजी महापौर अलका राठोड याही इच्छुक होत्या. प्रभाग २२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सदस्य नीला खांडेकर यांची उमेदवारी फिक्स केल्याने काँग्रेसच्या विद्यमान सदस्य फिरदोस पटेल यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.