चपळगावात काँग्रेस-भाजपमध्ये लढत होणार
By Admin | Updated: January 25, 2017 18:25 IST2017-01-25T18:25:01+5:302017-01-25T18:25:01+5:30
चपळगावात काँग्रेस-भाजपमध्ये लढत होणार

चपळगावात काँग्रेस-भाजपमध्ये लढत होणार
चपळगावात काँग्रेस-भाजपमध्ये लढत होणार
चपळगांव आॅनलाईन लोकमत
अक्कलकोट तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागरूक असणारा गट म्हणून चपळगाव मतदारसंघाला ओळखले जाते. जिकडे चपळगाव मतदारसंघ तिकडे तालुक्याचे नेतृत्व असे समीकरण आजपर्यंत पाहावयास मिळत आले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे या मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने येथे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असले तरी आगामी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशी मैत्री करीत चपळगाव मतदारसंघात वर्चस्व निर्माण केले होते. परंतु जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढोबळे हे निवडून आल्यानंतर पाहिजे तेवढा वेळ मतदारसंघात देऊ शकले नाहीत. आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी या भागात कार्यकर्त्यांचे काही प्रमाणात जाळे उभे केले असले तरी उमेदवारी देताना त्यांना निश्चितच विचार करावा लागणार आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढत होणार असल्याने इतर पक्षांना चांगलीच झुंज द्यावी लागणार आहे. आजवर चपळगाव मतदारसंघातील सदस्यांना सभापतीपद भोगता आले नाही. चपळगाव गणासाठी पंचायत समितीचे आरक्षण सर्वसाधारण आहे. त्यातच सभापतीपद सर्वसाधारण महिला असल्याने या ठिकाणी दोन्ही गटाकडून महिला उमेदवार देण्याचा विचार दोन्ही पक्षांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-----------------------
उमेदवारी कोणाला?
चपळगाव गटासाठी उमेदवारीसंदर्भात दोन्ही पक्षांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी हे चपळगाव गटातील हन्नूर या गावचे असल्याने त्यांना या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्न करावे लागतील. त्यांनी प्रत्येक गावातून उमेदवारांविषयी असणाऱ्या अपेक्षांची चाचपणी करत असून, आगामी निवडणुकांसाठी त्यांनी कंबर कसली आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा चपळगाव भागात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांनीही गुप्त बैठकांवर जोर दिला आहे.