आॅनलाईनवर तक्रार येताच घेतली गेली फिर्याद !
By Admin | Updated: July 8, 2014 00:59 IST2014-07-08T00:59:28+5:302014-07-08T00:59:28+5:30
तीन दिवसांमध्ये १३ हजार ८९६ जणांची वेबसाईटला भेट

आॅनलाईनवर तक्रार येताच घेतली गेली फिर्याद !
सोलापूर : एरव्ही साधी तक्रार अथवा फिर्याद घेण्यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागतात; मात्र आॅनलाईन तक्रार घेण्याच्या अद्ययावत यंत्रणेने त्यावर मात झाल्याचे एकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले. एकाने आॅनलाईनवर मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार नोंदवताच वरिष्ठांनी तातडीने दखल घेत संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून घेण्याचे आदेश दिले.
दरम्यान, तीन दिवसांमध्ये ६६६.२ङ्म’ंस्र४१ू्र३८स्रङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटला १३ हजार ८९६ जणांनी भेट दिल्याचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी शहर पोलीस आयुक्तालयाची नवी वेबसाईट तयार करण्यात आली असून, तीनच दिवसांपूर्वी ती सर्वसामान्यांच्या सेवेत रुजूही झाली. रविवारी आॅनलाईनवर पहिलीच तक्रार दाखल झाली. कुंभारवेस भागातील नागरिक महेश दामोदर कस्सा यांची मोटरसायकल (एमएच-१३/एटी-८१७४) १० जुलै २०१३ मध्ये चोरीस गेली होती. त्याबाबत त्यांनी तक्रार अथवा फिर्याद देण्यासाठी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गेले; मात्र पोलिसांनी टाळाटाळ करीत त्यांची फिर्याद दाखल करून घेतलीच नाही. दरम्यान, त्यांनी थेट आॅनलाईनवर आपली तक्रार नोंदवली.
वरिष्ठांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कानोसा घेतला. कस्सा यांची तक्रार योग्य असल्याचे निदर्शनास येताच वरिष्ठांनी त्यांची रीतसर फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षकाला दिले. वर्षभरापूर्वी झालेल्या चोरीची तक्रार अथवा फिर्याद घरबसल्या आॅनलाईनद्वारे नोंदवता येते, ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी बाब आहे.
--------------------------------
दोनदा संकेतस्थळ पाहा- पोलीस आयुक्त
नव्याने तयार करण्यात आलेले संकेतस्थळ (वेबसाईट) हे जनतेसाठी फायदेशीर आहे. कोणाच्या तक्रारी तर कोणाला पोलिसांविषयी काय वाटते आदींची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील संकेतस्थळ दिवसांमधून दोनदा उघडून पाहत चला, असा कानमंत्र पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा आणि इतर अधिकाऱ्यांना दिला आहे.