आतां जावें पंढरीसी। दंडवत विठोबासी।

By Admin | Updated: July 8, 2014 00:39 IST2014-07-08T00:39:53+5:302014-07-08T00:39:53+5:30

पंढरीत चार लाख भाविक; गोपाळपूरपर्यंत पददर्शन रांग, रांगेत एक लाख वारकरी

Come on Pandharasi. Dandavat Vithoba Bassi | आतां जावें पंढरीसी। दंडवत विठोबासी।

आतां जावें पंढरीसी। दंडवत विठोबासी।

 पंढरपूर: ‘आता जावें पंढरीसी।
दंडवत विठोबासी।।१।।
चंद्रभागेचिया तीरीं।
आम्हीं नाचों पंढरपुरीं।।२।।
जेथें संतांची दाटणी।
त्यांचे घेऊं पायवाणी।।३।।
तुका म्हणे आम्ही बळी।
जीव दिला पायां तळीं।।४।।’
आषाढी सोहळ्यासाठी ऊन, वारा, थंडी, ताप, पाऊस यांची तमा न बाळगता विठ्ठलाला दंडवत घालण्यासाठी पायी चालत आलेल्या वारकऱ्यांना आता आषाढी सोहळ्याचे वेध लागले आहेत. ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांमधील वारकरी पंढरी जवळ आल्याच्या आनंदात खेळत बागडत वाखरीच्या मुक्कामी विसावले असून, या पालख्या मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. पंढरीत चार लाख भाविकांची दाटी झाली आहे.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली भंडीशेगावचा मुक्काम हलवून वाखरीकडे मार्गस्थ होताच उभे आणि गोल रिंगण सोहळा करीत वाखरीच्या मुक्कामी विसावले तर जगद्गुरू संत तुकोबाराय पिराची कुरोलीतून निघून रिंगण करीत तेही वाखरीच्या पालखीतळाच्या मुक्कामी विसावले आहेत. रविवारी रात्री भोजनानंतर दहाच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने टाळ-मृदंगाच्या गजरात विठुनामात रात्रभर तल्लीन झालेले वारकरी मात्र पंढरीत पोहोचल्यानंतर वरूणराजा पावल्याच्या आनंदात मोठ्या उत्साहाने रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते. पंढरीही आली आणि पाऊसही झाला, असा भाव त्यांच्या मनी होता.
‘दया तिचे नाव भूतांचे पालन। आणिक निर्दालन कंटकांचे।।’ कंटकांचे निर्दालन करणाऱ्या विठ्ठलाचे दर्शन आता लवकरच होणार असल्याने वारकरी मात्र वाखरीच्या मुक्काम स्थळावर एका रात्रीसाठी विसावले. तुकोबा, ज्ञानोबा, सोपानकाका, निवृत्तीनाथ या सर्व पालख्या पंढरपूर समीप आल्या आहेत. मुक्ताबाई, एकनाथ, गजानन महाराजांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत.
विठ्ठलाची पददर्शन रांग ज्ञानेश्वर दर्शन मंडप, सेतू, सारडा भवन, नऊ दर्शन पत्राशेड ओलांडून गोपाळपूर पोलीस चौकीपर्यंत पोहोचली असून, यामध्ये सव्वा लाख भाविक आहेत. एका भाविकाला नऊ ते साडेनऊ तासांचा कालावधी दर्शनासाठी लागत असल्याचे ज्ञानेश्वर भीमराव भिसे (रा. पिंपरीखेडा) व महादेव खिस्ते (रा. निवळी, ता. जिंतूर, जि. परभणी) यांनी सांगितले. मुखदर्शन रांगेतही अडीच ते तीन हजार भाविक असून, त्यांनाही अर्धा ते पाऊण तासात दर्शन मिळत असून, आॅनलाइनसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

Web Title: Come on Pandharasi. Dandavat Vithoba Bassi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.