गुडेवारांची बदली रद्द करण्यासाठी गुरुवारी बंद

By Admin | Updated: June 25, 2014 01:43 IST2014-06-25T01:43:42+5:302014-06-25T01:43:42+5:30

विरोधकांचा निर्णय: बंद हाणून पाडण्याचे काँग्रेसचे आवाहन

Closed on Thursday for cancellation of Gudewar | गुडेवारांची बदली रद्द करण्यासाठी गुरुवारी बंद

गुडेवारांची बदली रद्द करण्यासाठी गुरुवारी बंद


सोलापूर: महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगळता गुरुवारी सोलापूर बंदचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत केले़ भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हे या बंदचे नेतृत्व करणार असल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह नेत्यांनी सांगितले़ दुसरीकडे काँग्रेस पक्षाने बैठक घेऊन विरोधकांचा हा बंद हाणून पाडा, पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद करू देऊ नयेत आपली ताकद दाखवा, असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष यलगुलवार यांनी केले आहे़
मंगळवारी सकाळी श्रमिक पत्रकार संघात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, माकपचे नरसय्या आडम मास्तर, बसपाचे आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, विष्णू कारमपुरी, सुनील शेळके, नगरसेवक प्रा़ अशोक निंबर्गी आदींनी एकत्र येऊन सोलापूर बंदचा निर्णय जाहीर केला़ गुरुवारी शहरातून दोन मोर्चे निघणार आहेत़ सकाळी ७ ते ४ या वेळेत बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनीदेखील या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे़ सकाळी १० वाजता शिवाजी चौक आणि दत्त चौक या दोन्ही ठिकाणांहून दोन मोर्चे निघणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येईल, असे आडम मास्तर यांनी यावेळी सांगितले़
गुडेवारसारखा कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाला मात्र त्यांनी घेतलेले निर्णय सत्ताधाऱ्यांना आवडले नाहीत, उलट त्यांना वर्षभर सतत त्रास देण्याचा प्रयत्न झाला़ त्यांच्या बदलीसाठी सुशीलकुमार शिंदे, आ़ दिलीप माने, आ़ प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला, त्यामुळे गुडेवारांची बदली मुख्यमंत्र्यांनी केली, असा आरोप आडम मास्तर यांनी केला़ काही कटू निर्णय घेतले असले तरीही गुडेवारांनी मनपाला शिस्त लावली, मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढविले, असे प्रा़ निंबर्गी म्हणाले़ शहराची प्रतिमा सुधारली जात असताना सत्ताधाऱ्यांनी त्यांना बदलले. मुख्यमंत्र्यांनी गुडेवार यांची बदली रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़
----------------------------
कामगारांना उशिरा सुचले शहाणपण
मनपाची परिस्थिती नाजूक बनल्यामुळे गेल्या वर्षी मनपा कामगारांचा पगार २५ टक्के कपात केला होता. अशा परिस्थितीमध्ये गुडेवार आल्यानंतर त्यांनी जोरदार काम करुन २०० कोटींवर उत्पन्न न जाणाऱ्या मनपा तिजोरीत ३०६ कोटी जमा करुन दाखविले़ कर्मचाऱ्यांना तब्बल ४० टक्के पगारवाढ दिली, असे असतानाही मनपातील कामगारांनी आणि त्या संघटनेच्या पुढाऱ्यांनी दोन दिवस काही केले नाही़ टीकेची झोड उठल्यानंतर कामगार नेते अशोक जानराव यांनी बुधवारी कामगार काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे सांगितले़ मात्र बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, असेही सांगितले़
------------------------------
बंद मोडीत काढा- यलगुलवार
एकीकडे सर्वपक्षीय बंद पुकारला गेला, त्याच वेळी काँग्रेसचे नूतन अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी काँग्रेस भवनात बैठक घेऊन विरोधकांचा बंद हाणून पाडा, असे आवाहन केले़ विरोधक राजकीय स्टंटबाजी करीत आहेत़ मनपा आयुक्त गुडेवार यांची प्रशासकीय बदली झाली असताना शिंदेसाहेबांवर उगीच आरोप केले जात असल्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात गुरुवारी थांबून दुकाने बंद करु देऊ नये, असे आवाहन केले़

Web Title: Closed on Thursday for cancellation of Gudewar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.