सोलापूर : अकरावीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कुलकर्णी तांडा (हत्तूर ता. दक्षिण सोलापूर) येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली. पूनम बाळू राठोड (वय १७, रा. कुलकर्णी तांडा हत्तुर) असे मयत तरुणीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घरात कुणी नसताना तिने छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला गळफासातून सोडून वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पूनमचे आई-वडील मजुरी करतात. पूनम अकरावी इयत्तेत शिकत होती. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य हे कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. पण तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, मयत पूनम हिच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेची विजापूर नाका पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास विलास घुगे हे करीत आहेत.