'शहर मध्य'मध्ये रंगणार चौरंगी लढत!
By Admin | Updated: September 24, 2014 13:52 IST2014-09-24T13:52:05+5:302014-09-24T13:52:05+5:30
सातत्याने तिरंगी लढतीत आलटून पालटून कौल देणार्या 'मध्य'मध्ये यंदा 'एएमआयएमआय' च्या उमेदवारामुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

'शहर मध्य'मध्ये रंगणार चौरंगी लढत!
>जगन्नाथ हुक्केरी■ सोलापूर
शहराच्या पूर्व भागातील यंत्रमाग, विडी कामगारांची लोकवस्ती आणि संमीश्र जाती समुदायांचे वास्तव्य असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघात राजकीय हालचाली वेगात सुरू असून,सातत्याने तिरंगी लढतीत आलटून पालटून कौल देणार्या 'मध्य'मध्ये यंदा 'एएमआयएमआय' च्या उमेदवारामुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. लढत चौरंगी असली तरी येथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, शिवसेनेचे महेश कोठे आणि माकपचे नरसय्या आडम यांच्यातच मतांसाठी मोठा संघर्ष होणार आहे.
काँग्रेसमध्ये इतकी वर्षे वाट पाहून हाती काहीच लागत नाही, याचा अंदाज आल्याने महेश कोठे यांनी थेट भगवा हातात घेऊन शिवबंधनात अडकले आणि प्रचाराला सुरूवात केली. तर एकेकाळी काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले ताज सोशल ग्रुपचे अध्यक्ष तौफिक शेख यांनीही काँग्रेसशी फारकत घेत 'एएमआयएमआय'च्या वतीने नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत. माकपाचे माजी आ. नरसय्या आडम यांचा पारंपरिक व हक्काचा मतदारसंघ असल्याने त्यांची तयारी गत पाच वर्षांपासून सुरूच आहे. आडम यांच्या कामाच्या पद्धतीमुळे सर्व समाजाची मते पडतात. मतदारांचा कौल बदलला किंवा प्रसंगानुसार आडम यांच्याबरोबर असलेले मतदार अन्य उमेदवारांच्या पाठीशी उभेही राहतात. या बाबी आजपर्यंत घडत आल्या आहेत.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी या मतदारसंघावर पकड घट्ट बसवत संपर्क वाढविला. विकास कामेही त्यांच्याकडून झाली. सत्तर फूट रोड परिसर, अक्कलकोट रोड एम.आय.डी.सी., हद्दवाढ भागातील रस्त्यांच्या कामांबरोबरच विडी कामगार, यंत्रमागधारक आणि उद्योजकांपर्यंत विविध योजना पोहोचविण्याचे काम करून मतदारांना काँग्रेस सोबत ठेवण्याचा आ. शिंदे यांनी केलेला प्रयत्न मोठा आहे. मतदारसंघात प्रभाग व वॉर्डनिहाय आधारकार्ड, मतदान कार्ड, राजीव गांधी आरोग्य विमा, बांधकाम कामगारांना कार्ड व धनादेश वाटप करून शासकीय योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्याच्या कामात आ. प्रणिती शिंदे यांचा पुढाकार आहे. जनहिताच्या योजनांची माहिती जनतेला करून देण्यात आ. शिंदे या पुढे आहेतच तर जनतेच्या न्याय- हक्कासाठी आंदोलने आणि मोर्चा काढून आवाज उठविण्याचा आडम यांच्या पद्धतीमुळे मतदारसंघात वजन आहे. एरवी काँग्रेसचे पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लीम समाजाच्या मतांचे 'एएमआयएमआय' चे नेते आ. अकबरोद्दीन ओवेसी यांच्या सभेमुळे विभाजन होईल की, हे मतदार काँग्रेसचाच हात पुन्हा बळकट करतील, यावर मतदारसंघातील काँग्रेसचे यश बरेच काही अवलंबून आहे. आघाडीचा तिढा न सुटल्याने राष्ट्रवादीनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
यामुळे ऐनवेळी कोण उमेदवार असणार, याचीही अधिक उत्सुकता आहे. प्रचार काळात घडणार्या घटना, वातावरण निर्मिती आणि जनतेचा कौल यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. शहर मध्य राजकीय
हालचाली
बोलविता धनी कोण?
■ माजी महापौर आरिफ शेख यांचे बंधू तौफिक शेख हे 'एआयएमआयएम'चा झेंडा घेऊन निवडणुकीसाठी सज्ज आहेत. काँग्रेसशी फारकत घेऊन मतविभागणीसाठीच शेख यांना 'एआयएमआयएम'मार्ग कोणी सुचविला? ही राजकीय खेळी करून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा डाव कोणाचा आहे? अशी चर्चा या मतदारसंघात आहे.