आंबोली : आंबोली येथे शुक्रवारी बसस्थानकानजीकच्या बिअरबारमध्ये दारू विकत घेण्याच्या कारणावरून मॅनेजरशी हुज्जत घालून बाटल्या फोडणाऱ्या कर्नाटक येथून आलेल्या पर्यटकांमध्ये व येथील नागरिकांमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाली. यावेळी नागरिकांनी त्या मद्यपी पर्यटकांना चोप दिला. त्यानंतर बारचालकाची कोणतीही तक्रार नसल्याने पोलिसांनी त्या पर्यटकांना सोडून दिले.आंबोली येथे शुक्रवारी पर्यटनासाठी आलेल्या कर्नाटकातील काही तरुणांनी बसस्थानकानजीकच्या बिअरबारमध्ये दारू विकत घेण्याच्या कारणावरून मॅनेजरशी वाद घालून बाटल्यांची तोडफोड केली. यावेळी बारमधील कामगारांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मद्यपी पर्यटकांनी तोडफोड व कामगारांनाही मारहाण करण्यास सुरु केली. यावेळी कामगारांनी आरडाओरड करीत आजूबाजूच्या नागरिकांना जमा केले. यावेळी या जमावाने या मद्यपी पर्यटकांना चांगलाच चोप दिला. दरम्यान, आंबोली बस स्थानकानजीक घडलेल्या या घटनेची पोलिसांना माहिती मिळाली. आंबोली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मद्यपी पर्यटकांना ताब्यात घेत चौकशी केली. मात्र, या घडलेल्या तोडफोड व मारहाणीबाबत बार चालकाने कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितल्याने या पर्यटकांना सोडून देण्यात आले. आंबोलीत काही ना काही कारणाने मद्यपी पर्यटकांकडून मारामारीच्या किरकोळ घटना घडत असतात. यात काहीवेळा स्थनिकांनाही मार खावा लागतोे. त्यामुळे पावसाळ्याचे चार महिने तरी मुख्य धबधबा, कावळेशेत, हिरण्यकेशी आदी पर्यटन स्थळांवर किमान दोनवेळा तरी पोलिसांनी गस्ती घालावी, अशी मागणी नागरिकांमधून होतआहे. (वार्ताहर)
मद्यपी पर्यटकांना चोप
By admin | Updated: August 9, 2014 00:36 IST