करमाळा : तालुक्यातील नाळेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका अनुराधा शिंदे यांनी प्लांट ट्री - ब्रेथ फ्री हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत दाखल होणाऱ्या पहिलीतील विद्यार्थ्यांसह शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी जाऊन विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप केले.
वृक्षलागवडीचे महत्त्व व गरज ओळखून शिंदे यांनी हा उपक्रम राबविला. वृक्षभेटीने पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचे स्वागत केल्याने नवागत विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून आला.
सध्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत. विद्यार्थी घरीच असून, त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अशा स्थितीत शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन रोपांची भेट देऊन वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी शिक्षकांनी वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, विस्ताराधिकारी अनिल बदे, केंद्रप्रमुख दत्तात्रय खाटमोडे यांनी कौतुक केले आहे.
----
१७करमाळा-ट्रीगार्ड
नाळेवस्ती येथे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वृक्षभेट देताना शिक्षिका अनुराधा शिंदे.