अकलूज येथे उभारणार छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:25 IST2021-01-16T04:25:51+5:302021-01-16T04:25:51+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. त्याची इतिहास अभ्यासक, संशोधकांना सखोल माहिती एकाच ठिकाणी मिळावी, या हेतूने अकलूज ...

अकलूज येथे उभारणार छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. त्याची इतिहास अभ्यासक, संशोधकांना सखोल माहिती एकाच ठिकाणी मिळावी, या हेतूने अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र व शिव ग्रंथालय उभारण्यात येत आहे. या केंद्रात शहाजी महाराजांपासून शिवजन्म पूर्वकाल, शिवकाल, शिव उत्तरकाल, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, आष्टीच्या लढाईपर्यंत मराठेकालीन कागदपत्रे, ऐतिहासिक दस्ताऐवज, संदर्भ साधने, मूळ ग्रंथ, बखरी व तत्कालीन पत्रव्यवहार उपलब्ध असतील.
गड, किल्ले, प्रशासन, आरमार, घोडदळ, शिवकालीन नाणे चलन इत्यादी साधने, संशोधन व अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याचा इतिहासप्रेमी संशोधक, अभ्यासकांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन शस्रविद्या प्रशिक्षण, शिवव्याख्याने, शिवविचारांचे पुस्तक प्रदर्शन, दुर्गभ्रमंती असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले. यावेळी तेजपाल वाघ, प्रा. डाॅ. विश्ववनाथ आवाड, अनिल जाधव, श्रीकांत राऊत उपस्थित होते.
कोट ::::::::::::::::::::
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणाल्याने शिवाजी महाराजांचे आदर्शवत जीवनचरित्र उमजत नाही. त्यासाठी शिवाजी महाराज यांचे पुस्तकरूपी वाचन करून समजून घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वैभवाची ओळख करून देण्यासाठीच धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पाऊल उचलले आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या सांस्कृतिक चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम ते करीत आहेत.
- तेजपाल वाघ
दिग्दर्शक, कारभारी लई भारी मराठी चित्रवाहिनी मालिका