दानम्मादेवी यात्रेची रथोत्सवाने सांगता
By Admin | Updated: November 23, 2014 23:46 IST2014-11-23T21:46:02+5:302014-11-23T23:46:16+5:30
गुड्डापुरात भाविकांची गर्दी : महाआरतीचे आयोजन

दानम्मादेवी यात्रेची रथोत्सवाने सांगता
जत : तालुक्यातील गुड्डापूर येथे रथोत्सव व महाआरती कार्यक्रम होऊन (शनिवारी) दानम्मादेवी यात्रेची सांगता झाली. या यात्रेत सुमारे तीन कोटींची उलाढाल झाली. यात्रेसाठी हजारो भाविकांनी परतीचा मार्ग धरल्यानंतर गुड्डापूर गावातून चारही दिशांना जाणाऱ्या रस्त्यांवर भाविक आणि वाहनांची गर्दी दिसून येत होती.
शनिवारी रात्री दानम्मादेवी मंदिरापासून सुमारे पाचशे फूट अंतरावर असलेल्या पादगट्टी येथे खा. संजय पाटील, आमदार सुरेश खाडे (मिरज), आमदार विजयकुमार देशमुख (सोलापूर) यांच्याहस्ते दानम्मा देवीच्या रथाची पूजा करण्यात आली. नंतर मिरवणुकीने देवीचा रथ गावातील बसेश्वर चौकात आणण्यात आला. रथ मंदिर परिसरात आणून मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली.
यावेळी भाविकांनी देवीच्या नावाचा जयघोष केला. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार डी. एम. कांबळे, देवस्थान समिती अध्यक्ष चंद्रशेखर पुजारी, संचालक सी. आर. गोब्बी, बी. एस. गाडवे, सिध्दय्या हिरेमठ, विश्वनाथ गणी, म्हमदापूर गवाप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.
एसटी बस वाहतूक, करमणूक, मेवा-मिठाई, खेळणी, पाळणे आदी बाबीतून यात्रेत सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. (वार्ताहर)
यात्रेत तीन कोटींची उलाढाल
गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील हजारो भाविक हजेरी लावतात. शनिवारी रात्री मंदिरापासून जवळच असलेल्या पादगट्टी येथे खा. संजय पाटील, आ. सुरेश खाडे, आ. विजयकुमार देशमुख यांच्याहस्ते पूजा करून रथोत्सवास सुरुवात झाली. तीन दिवस सुरू असलेल्या या यात्रेची सांगता रथोत्सव तसेच महाआरतीने झाली. जत आगाराने यात्रेसाठी खास बसेसची सोय केली होती. आगारास लाखोंचे उत्पन्न मिळाले. मेवा मिठाई, खेळणी, करमणुकीचे कार्यक्रम तसेच इतर बाबींतून यात्रेत सुमारे तीन कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.