साेलापूरला मंजूर झालेले अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलवले; काँग्रेसचा आरोप
By राकेश कदम | Updated: November 25, 2023 18:31 IST2023-11-25T18:30:57+5:302023-11-25T18:31:06+5:30
काॅंग्रेस नेत्यांची अजितदादांवर कडाडून टीका

साेलापूरला मंजूर झालेले अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलवले; काँग्रेसचा आरोप
साेलापूर - संयुक्त राष्ट्र संघाने यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पाैष्टिक तृणधान्य म्हणून घाेषित केले आहे. यापार्श्वभूमीवर भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. हे केंद्र साेलापूरऐवजी बारामती येथे स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. राज्य सरकारने शनिवारी ही घाेषणा केली.
हा निर्णय साेलापूरवर अन्याय करणारा आहे. भाजप नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार घडला आहे. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदाेलन उभारावे लागेल, असा इशारा काॅंग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिला. कुलकर्णी म्हणाले, एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर, ठाणे व नंदूरबार या जिल्ह्याकरीता हे केंद्र होते 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या प्रकल्पासाठी शासन खर्च करणार होता. परंतु सदर केंद्र हलवल्यामुळे सोलापूर जिल्हा हा विकासापासून वंचित राहणार आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असून याची सर्वस्वी जबाबदार जनता पार्टीची आहे.