सावधान... बार्शीत महिनाभरात तब्बल २६ जणांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:04+5:302020-12-05T04:44:04+5:30
बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. सावकाराचे कर्ज, ...

सावधान... बार्शीत महिनाभरात तब्बल २६ जणांच्या आत्महत्या
बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. सावकाराचे कर्ज, दीर्घ आजार, व्यसनाधीनता ही याची प्रमुख कारणे आहेत. ग्रामीणमध्ये महिला तर शहरात युवकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
बार्शी शहर, तालुका, वैराग, पांगरी या चार पोलीस ठाण्यात नोव्हेंबर महिन्यात तब्बल २६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ११ आत्महत्येची नोंद ही बार्शी शहरात झाली आहे़ वैराग हद्दीत ७, पांगरीमध्ये ३ आणि तालुका पोलीस स्टेशनमध्ये ५ अशा एकूण २६ आत्महत्या झाल्या आहेत़ यामध्ये प्राधान्याने गळफास घेऊन, विषप्राशन करून व विहिरीत उडी मारून केलेल्या आत्महत्येचा समावेश आहे़ यातील ३ या आर्थिक अडचणींमुळे, २ दीर्घ आजाराला कंटाळून, पाच व्यसनाधीनतेमुळे व पाच आत्महत्या या सावकाराच्या कर्जाला कंटाळून झाल्या आहेत
बार्शी शहरात सोशल मीडियावर परिचित असलेल्या व युवक वर्गात लोकप्रिय असलेले मंगेश अशोक भाकरे, प्रशांत गायकवाड, रवींद्र पोपट गुंड, व्यापारी सूर्यकांत भोईटे, नवनाथ रोडे, नितीन कोरे या युवकांच्या आत्महत्येने सोशल मीडियात खूप चर्चा झाली़ बार्शीकर युवक सातत्याने का आत्महत्या करत आहेत यावर चिंता व्यक्त केली जााऊ लागली.
कोट ::::::
आजचा तरुण सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत गुरफटत चालला आहे़ त्याचा जवळच्या व्यक्तीशी असलेला संवाद हा कमी होत चालला आहे़ ज्यावेळी तो अडचणीत येतो तेव्हा त्याला मनमोकळे करण्यासाठी कोणीच नसते़ त्यामुळे युवकांनी या आभासी दुनियेतून बाहेर पडून आपला मित्र परिवार, कुुटुंब व नातलग यांच्याशी घट्ट नाते जोडावे. मन मोकळे करावे.
- विजय राऊत
अध्यक्ष, जय शिवराय प्रतिष्ठान