आबुटे व डोंगरे यांची उमेदवारी
By Admin | Updated: September 3, 2014 00:44 IST2014-09-03T00:44:19+5:302014-09-03T00:44:19+5:30
महापौर-उपमहापौरपद : विरोधकांतर्फे गदवालकर व चव्हाण यांचे अर्ज

आबुटे व डोंगरे यांची उमेदवारी
सोलापूर : महापौर पदासाठी काँग्रेसकडून सुशीला आबुटे तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण डोंगरे यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी दाखल केली आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पक्षश्रेष्ठींनी नावांची घोषणा केल्यावर दोघांनी दुपारी सव्वाबारा वाजता नगरसचिव ए. ए. पठाण यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपा—सेना युतीनेही दोन्ही पदांसाठी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
काँग्रेसतर्फे महापौर पदाचा उमेदवार कोण याची बरीच उत्सुकता होती. दुपारी बारा वाजता शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर महापालिकेत आले व त्यांनी बैठक घेतली. बैठकीत पक्ष प्रमुखांकडून फॅक्स आल्यावर नावांची घोषणा केली जाईल असे सांगितले. काँग्रेसतर्फे आबुटे व श्रीदेवी फुलारे यांचे समर्थक उत्सुकतेने आले होते. बारा वाजेच्या सुमाराला आबुटे व डोंगरे यांच्या नावांची घोषणा दोन्ही पक्ष प्रमुखांनी केली.
त्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी सभागृह नेते संजय हेमगड्डी, शिवलिंग कांबळे, पैगंबर शेख, देवेंद्र भंडारे, चेतन नरोटे, कुमुद अंकाराम, मंदाकिनी तोडकरी, सुधीर खरटमल, हेमा चिंचोळकर यांच्यासह काँग्रेसचे जवळ जवळ २५ नगरसेवक तर डोंगरे यांच्याबरोबर हारून सय्यद, दिलीप कोल्हे, नाना काळे, इब्राहिम कुरेशी, खैरूनिस्सा शेख, सुनीता रोटे, गीता मामड्याल, किशोर माडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीतर्फे नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगार उपमहापौर पदासाठी उत्सुक होत्या. डोंगरे यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. १५ वर्षे मी नगरसेविका आहे, भविष्यात संधी मिळेल की नाही सांगता येणार नाही, पण पक्ष प्रमुखांनी मला न्याय द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
----------------------------
युतीत एकमत नाही
भाजपा—सेना युतीतर्फे महापौर पदासाठी भाजपाच्या नरसूबाई गदवालकर तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या मेनका चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली. तत्पूर्वी प्रभारी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. सुरेश पाटील, मोहिनी पत्की, रोहिणी तडवळकर, नागेश वल्याळ, जगदीश पाटील यांनी बैठकीला शहराध्यक्ष नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. या पदांच्या निवडीसाठी व्यूहरचना तयार करण्यासाठी आ. विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घ्यायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त होत होती. या दोन्ही पदांबाबत युतीत एकमत नसल्याचे स्पष्ट झाले. सेनेचे गटनेते भीमाशंकर म्हेत्रे बैठकीला हजर होते पण पदाधिकारी कोणी आले नाहीत.
-----------------------------
६ रोजी होणार निवड
महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे आबुटे, भाजपातर्फे गदवालकर तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीतर्फे डोंगरे, सेनेतर्फे चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्व पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना व्हीप दिला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले महेश कोठे यांनी काही खेळी करू नये म्हणून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या बैठकीला कोठे किंवा सेनेचे पदाधिकारी नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कोठे आमच्याबरोबर होते अशी माहिती शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिली. महापौर राठोड तर उपमहापौर सय्यद यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल ५ सप्टेंबर रोजी संपत आहे. दोन्ही पदाच्या निवडीसाठी ६ सप्टेंबरला सकाळी ११ वा. महापालिकेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक बोलाविण्यात आली आहे.
---------------------------------
महापालिकेत सत्तांतर करणार म्हणून महेश कोठे शिवसेनेत आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षप्रमुखांनी समन्वयाची बैठक घ्यायला हवी होती. इच्छुक उमेदवार पक्षप्रमुखांकडे गेले तरी त्यांची दखल घेण्यात आली नाही. चमत्कार दाखविण्याची ही वेळ आहे.
- सुरेश पाटील नगरसेवक, भाजपा