कोठेंचे नगरसेवकपद रद्द करा
By Admin | Updated: September 3, 2014 00:41 IST2014-09-03T00:41:05+5:302014-09-03T00:41:05+5:30
शहर काँग्रेसचे विभागीय आयुक्तांना पत्र

कोठेंचे नगरसेवकपद रद्द करा
सोलापूर: माजी महापौर आणि महापालिकेचे सभागृह नेते महेश कोठे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला; मात्र त्यांना पक्षातून काढण्यात आले़ आता काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि महापालिकेतील विद्यमान सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी विभागीय आयुक्तांना पत्र देऊन कोठे यांचे नगरसेवकपद रद्द करावे अशी मागणी केली आहे़मनपा आयुक्तांना देखील हे पत्र दिले असून, अपात्र ठरविण्याचा अधिकार मात्र विभागीय आयुक्तांचा आहे़
कोठे हे बऱ्याच दिवसांपासून पक्ष सोडण्याच्या तयारीत होते़ अखेर ६ आॅगस्ट रोजी त्यांनी पक्ष सोडून शहर मध्यमधून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला़ त्यानंतर कोठे विरुद्ध काँग्रेस असा सामना सुरू झाला आहे़ कोठे यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले़; मात्र त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत काँग्रेसकडून कोणत्याही हालचाली सुरू नव्हत्या़ मंगळवारी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि संजय हेमगड्डी यांनी संयुक्त पत्र देऊन कोठेंना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे़ त्यामुळे कोठेंचा मनपातील पत्ता कट करण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होणार का हे आता विभागीय आयुक्तांच्या हातात आहे़ विभागीय आयुक्तांनी कोठे यांना नोटीस पाठवून सुनावणी घेतली आणि त्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करतील असे प्रथमदर्शनी कायद्यानुसार दिसते़
इकडे महेश कोठे यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर तसेच आमदार प्रणिती शिंदेंवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीकास्त्र सुरू केले असल्यामुळे महिनाभराने का होईना मंगळवारी २ सप्टेंबर रोजी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी काँग्रेसकडून केली आहे़
-----------------------
महेश कोठे यांनी स्वेच्छेने ६ आॅगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश केला आहे़ शिस्तभंग केली म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकले आहे़ महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ मधील ३ अ नुसार कोठेंना महापालिकेचे नगरसेवक म्हणून अपात्र ठरवावे अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे़
- प्रकाश यलगुलवार
अध्यक्ष-सोलापूर शहर काँग्रेस