बसस्थानकाचे लूक बदलणार !
By Admin | Updated: September 23, 2014 14:14 IST2014-09-23T14:14:53+5:302014-09-23T14:14:53+5:30
आरामदायी बाकडे, विद्युतीकरण आणि समोरचा भाग आकर्षक करण्यात येणार असून, यासाठी ६४ लाख ६३ हजारांची तरतूद केल्याने आता सोलापूर बसस्थानकाचे लूक बदलणार आहे.

बसस्थानकाचे लूक बदलणार !
जगन्नाथ हुक्केरी ■ सोलापूर
मोडके—तोडके बाकडे, परिसरातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांतून वाहणारे घाण पाणी, दुर्गंधी आणि अंतर्गत विभागातील अडचणी, लोंबकळत असलेल्या वायरी हे पूर्वीचे सोलापूर बसस्थानकाचे रूप आता नूतनीकरणामुळे बदलणार आहे. आरामदायी बाकडे, विद्युतीकरण आणि समोरचा भाग आकर्षक करण्यात येणार असून, यासाठी ६४ लाख ६३ हजारांची तरतूद केल्याने आता सोलापूर बसस्थानकाचे लूक बदलणार आहे.
सोलापूर बसस्थानकात प्रवेश करताना घाणीच्या साम्राज्याचा सामना करतच आत प्रवेश करावा लागत होता. प्रतीक्षालयात बसण्यासाठी चांगली व्यवस्था नसल्याने प्रवाशांना जागा मिळेल तेथे बसावे लागत असे. स्पिकर आणि विजेच्या वायरीही छताला लोंबकळत होत्या. काही वायरींवरील कव्हरही निघाल्याने यापासून धोकाही अधिक होता. मात्र यासाठी दुरूस्तीचा प्रयत्न झाला नव्हता. रंग उडाल्याने भिंतींना अवकळा प्राप्त झाली होती. बसस्थानकाची ही अवकळा दूर करण्यासाठी मुख्यमंत्री निधी मिळाला असून, यातून नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात बसस्थानकावर येणार्या—जाणार्या प्रवाशांना चांगली सोय मिळण्यास मदत होणार आहे. बाकड्यांना ग्रेनाईट बसविण्यात येणार असून, कॉलमलाही आता ग्रॅनाईट लावण्यात येणार आहे.
बसस्थानकाला आतून व बाहेरूनही रंग देण्यात येणार असून, आगारप्रमुख, कॅशियर, चौकशी कक्ष, पोलीस मदत केंद्र, हिरकणी कक्ष, चालक—वाहकांच्या खोल्या, स्वच्छतागृहांच्याही रचनेत बदल करून नव्या पद्धतीने व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नूतनीकरण करण्यात येणार आहे. यात अंतर्गत भागातील डांबरीकरणाचाही समावेश असल्याने बसस्थानक आवारातील रस्तेही भविष्यात चकाचक होणार आहेत. डोअर, खिडक्या, विद्युतीकरण, आरामदायी सेवा करण्यासाठी बसस्थानकाची काही प्रमाणात रचना बदलून नूतनीकरण करण्यात येणार आहे. अवकळा आलेल्या भिंतींना प्लॅस्टर करून, रंगरंगोटी करण्यात येणार असल्याने भिंतीही आकर्षक दिसणार आहेत. विजेसाठी डोळ्यांना त्रास होणार नाही असे बल्ब वापरण्यात येणार आहेत. नूतनीकरणामध्ये स्वच्छता व सेवेवर अधिक भर देण्यात आल्याने प्रवाशांबरोबरच राज्य परिवहन महामार्गाच्या कर्मचार्यांना लूक बदललेल्या बसस्थानकामध्ये आरामात काम करणे शक्य होणार आहे. सोलापूर बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी ६४ लाख ६३ हजारांचा निधी मिळाला असून, कामाला सुरूवात केली आहे. नूतनीकरण, बदल, विद्युतीकरण, डांबरीकरण ही कामे लवकर संपवून प्रवाशांना चांगली सोय देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. वेळेत हे काम पूर्ण होणार आहे.
— शशिकांत उबाळे,
विभागीय अभियंता, राज्य परिवहन महामंडळ ..यामुळे उशीर
■ सोलापूर बसस्थानकाच्या नूतनीकरणाला डिसेंबर २0१३ रोजी मंजुरी मिळाली असून, तांत्रिक अडचणीमुळे या कामाला उशिरा झाला आहे. दरम्यान ठेकेदारांनीही काम चांगले करण्यासाठी मुदतही वाढवून मागितली होती. आता लांबलेल्या कामाला सुरूवात झाली असून, लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. ..अशी आहे तरतूद
■ बसस्थानक नूतनीकरणासाठी मुख्यमंत्री निधीतून ६४ लाख ६३ हजारांचा निधी मिळाला असून, नूतनीकरण ४९ लाख ६३ हजार, डांबरीकरण १0 लाख, विद्युतीकरण ५ लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. आता कामाला सुरूवात झाली असून, नूतनीकरण झाल्याने विद्युतीकरणाचे काम करून, रंगरंगोटी करण्यात येणार आहे.