घरफोडी करणारा एक जण अटकेत
By Admin | Updated: June 24, 2014 01:19 IST2014-06-24T01:19:21+5:302014-06-24T01:19:21+5:30
घर फोडून चोरी करणाऱ्यास जेलरोड पोलिसांनी अटक केली

घरफोडी करणारा एक जण अटकेत
सोलापूर : जोडबसवण्णा चौकातील बाकळे प्रिंटिंग प्रेसच्या पहिल्या मजल्यावरील घर फोडून चोरी करणाऱ्यास जेलरोड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
संतोष संजय कांबळे (वय २२, रा. आडवा नळ, जय मल्हार चौक, सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. रविवारी रात्री तो मार्कंडेय उद्यानाजवळ संशयास्पद स्थितीत फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केल्यावर सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या पायातील चप्पलकडे लक्ष गेल्यावर पोलिसांचा संशय बळावला. १३ मे रोजी पहाटे आनंद बाकळे (रा. सिद्धार्थ रेसीडेन्सी, रेल्वे लाईन) यांच्या जोडबसवण्णा चौकातील प्रिंटिंग प्रेसमध्ये चोरी झाली होती. चोरट्याने प्रेसच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर प्रवेश करून कपाट उचकटून आतील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ३ लाख ६१ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. घटनेनंतर पोलिसांनी चोरट्याचा माग काढताना मजल्यावर चपलाचे निशाण आढळले होते. संतोष याच्या पायातील चप्पल या निशाणाशी जुळली. त्यावरून पोलिसांनी खाक्या दाखविल्यावर दोन साथीदारांच्या मदतीने त्याने बाकळे यांचे घर फोडल्याची कबुली दिली.