बोगस मतदानावर ठेवणार करडी नजर : एस विरेश प्रभू

By Admin | Updated: February 2, 2017 16:12 IST2017-02-02T16:12:47+5:302017-02-02T16:12:47+5:30

बोगस मतदानावर ठेवणार करडी नजर : एस विरेश प्रभू

Bogs will keep on voting: S Vireesh Prabhu | बोगस मतदानावर ठेवणार करडी नजर : एस विरेश प्रभू

बोगस मतदानावर ठेवणार करडी नजर : एस विरेश प्रभू

बोगस मतदानावर ठेवणार करडी नजर : एस विरेश प्रभू
विलास जळकोटकर : आॅनलाईन लोकमत सोलापूर
राज्यात एकाचवेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका एकत्रित होत आहेत. सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुका शांतता व सुव्यवस्थेला गालबोट न लागता होण्यासाठी ग्रामीण पोलीस दल सज्ज आहे. अधिकाऱ्यांसह तब्बल ७ हजार पोलिसांच्या फौजफाट्याचे नियोजन आखले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांसह कुठेही बोगस मतदान होणार नाही, या दृष्टीने पोलिसांची करडी नजर असणार आहे. या काळात गैरमार्गाचा अवलंब करणारा कोणी आढळला तर त्याची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम धाकदपटशाह करणाऱ्या मंडळींना जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू ‘लोकमत’शी संवाद साधताना भरला.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शहरातील महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. जिल्हा परिषदेचे ६८ गट आणि १३६ गण अशा दोन्ही निवडणुका एकाचवेळी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेवर मोठा ताण असणार आहे. त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष बैठक आयोजित करुन बंदोबस्ताचा आराखडा तयार केला आहे.
ज्यांना पोलीस यंत्रणेमार्फत स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे, त्यांच्याकडून खबरदारी म्हणून शस्त्रे जमा करण्यात येत आहेत. भा. दं. वि. १०७ अन्वये ९०७ जणांवर १०७ प्रमाणे ६८, ११० अन्वये कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. कलम १४४ अन्वये कारवाईसाठी आॅर्डरी काढण्यात आल्या आहेत. कलम १४९ अन्वये ४३० जणांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून ३५० जणांना अजामीन वॉरंट बजावण्यात आले आहे.
निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात यासाठी ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक दिलीप चौगुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्यासह पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रण सज्ज ठेवण्यात आली आहे.
पन्नास जणांवर हद्दपारीची कारवाई
- शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या ५० जणांना १ वर्षासाठी हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव तयार केले असून, यातील सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय मतदान काळात उपद्रवी ठरणाऱ्या २५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बडगा उगारण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
असा असेल बंदोबस्त
- जिल्ह्यातील ६८ जि. प. गट आणि १३६ गणांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण २३३० बुथ असून, १३५८ इमारतींमधून मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी १२ पोलीस उपअधीक्षक, ३० पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक १६३, पोलीस ४५२१, होमगार्ड २०३८, एसआरपी चार तुकड्या (४००), पेट्रोलिंग वाहने २०४ आणि वायरलेस यंत्रणा २२६ असा चोख बंदोबस्त असणार आहे.
बंदोबस्तावर एक नजर...
- पोलीस यंत्रणेच्या पाहणीनुसार जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस आणि मोहोळसह अन्य तालुक्यांतील ६६ संवेदनशील गावांची यादी करण्यात आली आहे. या प्रत्येक गावामध्ये दोन पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
- ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या ठिकाणी नऊ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
- स्ट्रायकिंग फोर्समध्ये १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ फौजदार असे ११ जण असणार आहेत.
- टास्कफोर्समध्ये ११ फौजदार, एसआरपीएफच्या चार तुकड्या, ११ वाहने, ११ बिनतारी संदेश यंत्रणा असेल.
- पोलीस निरीक्षक पेट्रोलिंगमध्ये ३० जणांचा समावेश आहे. यात बिनतारी संदेश यंत्रणेसह वाहन, १ पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी असतील.
- सेक्टर पेट्रोलिंगसाठी १२५ जण तैनात केले आहेत. प्रत्येक पेट्रोलिंगमध्ये १ अधिकारी, दोन पोलीस आणि दोन होमगार्ड, बिनतारी संदेश यंत्रणेसह वाहन
- तहसीलनिहाय पोलीस ठाणे स्ट्रायकिंग ११ ठिकाणी असेल. प्रत्येक स्ट्रॉयकिंग फोर्ससोबत १ फौजदार आणि १० पोलीस असणार आहेत.
- ११ तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी १ निवडणूक निरीक्षक असेल.
- महसूल झोनमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे १७६ पोलीस कर्मचारी असतील.
- राज्य व जिल्हा बॉर्डर सीलिंगसाठी दोन पाळ्यांमध्ये २२ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
- अपर पोलीस अधीक्षकांच्या स्ट्रायकिंग फोर्समध्ये १ फौजदार व पाच कमांडो असतील.
- पोलीस अधीक्षकांच्या स्ट्रायकिंग फोर्समध्ये १ फौजदार व पाच कमांडो असणार आहेत.
- नियंत्रण कक्षात ३ राखीव स्ट्रायकिंग फोर्स ठेवण्यात येणार आहेत. यावर १ जिल्हा पोलीस उपअधीक्षकांचे नियंत्रण असणार आहे.
- १०० मीटर परिसरात पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी १ पोलीस व १ होमगार्ड याप्रमाणे १३५८ जणांचा बंदोबस्तासाठी ताफा असणार आहे.

Web Title: Bogs will keep on voting: S Vireesh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.