गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:40+5:302021-09-14T04:26:40+5:30
मोहोळ (जि. सोलापूर) : चार महिन्यांपूर्वी लग्न झालेला आणि अंध-आई वडिलांचा एकुलता एक आधार असणारा युवक गणपती विसर्जनासाठी गेल्यानंतर ...

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला
मोहोळ (जि. सोलापूर) : चार महिन्यांपूर्वी लग्न झालेला आणि अंध-आई वडिलांचा एकुलता एक आधार असणारा युवक गणपती विसर्जनासाठी गेल्यानंतर बुडून मरण पावला. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने शोध घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचे प्रेत सापडले.
सौरभ बेंबळघे (वय १८, रा. साकोळ, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) मोहोळ येथील रेल्वेसाठी लागणाऱ्या स्लीपर फॅक्टरमध्ये काम करीत होता. चार महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी गणपती बसविला होता. दीड दिवसांनी त्याचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी सीना नदीवरील आष्टे बंधाऱ्यात सर्वजण गेले. दुपारी तीन वाजता बंधाऱ्याजवळील खडकावरून ते खाली उतरले. आनंदाने जयघोष करीत विसर्जन करीत असताना आलेल्या पाण्याच्या प्रवाहात सौरभ बुडाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शनिवार व रविवार या दोन दिवसांत कोळेगाव येथील मच्छिमारांच्या मदतीने आष्टे बंधारा ते लांबोटीपर्यंत सौरभचा शोध घेण्याचे काम लक्ष्मण मल्लाव, दत्ता भोई, बालाजी भोई, ज्ञानेश्वर भोई, तुकाराम भोई, दीपक भोई, दत्तात्रय मल्लाव, सोमनाथ वाघमोडे यांनी सुरू केले. आष्टे बंधाऱ्यापासून लांबोटी गावापर्यंत सुमारे सहा किलोमीटरच्या अंतरात त्याचा शोध सुरू होता. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नदीपात्राजवळील शेतात एका झाडाला त्याचा मृतदेह अडकल्याचे आढळून आले. मोहोळ पोलिसांनी कोळेगाव येथील मच्छिमाराच्या साहाय्याने मोठा दोर बांधून त्याचा मृतदेह बाहेर काढला .
..........
अंध मातापित्यांच्या जीवनात पुन्हा अंध:कार
अंध आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या सौरभने १२ वी पर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे असणाऱ्या फॅक्टरीत कामाला लागला. चार महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. कष्टप्रद आयुष्यात आनंदाचे क्षण आले असतानाच काळाने घाला घातला आणि बेंबळघे कुटुंबाला पुन्हा अंध:काराच्या गर्तेत लोटले. सौरभच्या निधनाचे वृत्त कळताच या मातापित्यांनी हंबरडा फोडला.