मृतदेहाला १९ किलोमीटर नेले फरफटत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:16 IST2021-06-17T04:16:03+5:302021-06-17T04:16:03+5:30
बार्शी (जि. सोलापूर) : शेतामधून घराकडे निघालेल्या पादचाऱ्यास उस्मानाबाद जिल्ह्यात अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो वाहनाच्या खालील बाजूस ...

मृतदेहाला १९ किलोमीटर नेले फरफटत
बार्शी (जि. सोलापूर) : शेतामधून घराकडे निघालेल्या पादचाऱ्यास उस्मानाबाद जिल्ह्यात अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तो वाहनाच्या खालील बाजूस अडकला आणि तब्बल १९ किलोमीटर अंतरावर फरफटत गेला. रक्तबंबाळ अवस्थेत तो मृतदेह बार्शी येथील उपळाईरोडवर पडला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी शोध घेऊन पंचनामा केला असता त्या व्यक्तीची ओळख पटली. बिभीषण सूर्यभान बागल (वय ५५, रा. ब्रह्मगाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे.
अज्ञात व्यक्तिचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी पंचनामा करून त्याचा तपास केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर बिभीषण याच्या भावाने त्याला ओळखले. विष्णू सूर्यभान बागल (रा. ब्रह्मगाव, तालुका परंडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत बिभीषण बागल हा १५ जून मंगळवारी दिवसभर शेतात मजुरीचे काम करून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतातील कामावरून पायी घराकडे येत होता. ढग पिंपरी फाटा येथे परांडा ते बार्शी येणाऱ्या रोडवर अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली. यामुळे बिभीषण वाहनाच्या खालील बाजूस स्प्रिंग पाट्यामध्ये अडकला. वाहनाने ढग पिंपरी फाटा (तालुका परंडा) येथून दोन लिंब उपळाई रोड बार्शी असे १९ किलोमीटर अंतरावर फरफटत नेले. वाहनाला अडकलेला मृतदेह रस्त्यावर पडल्यानंतर अज्ञात वाहन निघून गेले.
पोलिसांना या घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन तासात तपास करून मयताच्या नातेवाईकांचा शोध घेऊन पुढील तपासासाठी परंडा पोलीस स्टेशनला हा गुन्हा वर्ग केला आहे.
हाता - पायाविना मृतदेह
अज्ञात वाहनाच्या स्प्रिंग पाट्यात बिभीषण बागल अडल्याने ढग पिंपरी फाटा (तालुका परंडा) येथून दोन लिंब उपळाई रोड बार्शी असा १९ किलोमीटर फरफटत प्रवास झाला. यात मृतदेहाचे दोन्ही हात, पाय तुटून पडल्याचे पंचनामा करताना पोलिसांच्या निदर्शनास आले.