सोलापूरातही भाजप-शिवसेनेला सुरुंग!
By Admin | Updated: January 28, 2017 12:41 IST2017-01-28T12:41:37+5:302017-01-28T12:41:37+5:30
सोलापूरातही भाजप-शिवसेनेला सुरुंग!

सोलापूरातही भाजप-शिवसेनेला सुरुंग!
सोलापूरातही भाजप-शिवसेनेला सुरुंग!
सोलापूर : आॅनलाईन लोकमत सोलापूर
मुुंबईत भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाल्याचा परिणाम संबंध महाराष्ट्रभर झाला असून, शिवसेनेने राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करताच सोलापुरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. आता सोलापुरातही शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणुकीच्या सामोरे जाणार आहे.
सोलापुरात भाजप-शिवसेनेची युती व्हावी, यासाठी स्थानिक पातळीवर दोनवेळा बैठका झाल्या. शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि खा. शरद बनसोडे यांची भेट घेऊन युतीबाबत चर्चा केली. भाजपने शिवसेनेला ३३ जागा देण्याची तयारी दर्शविली होती. पण शिवसेना ४३ जागांवर ठाम होती. युतीबाबत तिसरी बैठक होण्यापूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपशी राज्यात कुठेही युती केली जाणार नसल्याची घोषणा करून युतीसाठी आशेने बसलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या स्वप्नावर पाणी पडले.
गेल्या २०१२ ची निवडणूक भाजप-सेनेने युती करूनच लढविली होती. भाजपने महापालिकेच्या त्यांच्या वाट्याला आलेल्या ५९ जागांपैकी ५७ जागा लढविल्या. त्यापैकी २५ जागांवर त्यांनी विजय मिळविला होता. तर शिवसेनेने ४३ पैकी ३९ जागा लढवून ८ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती केल्याचा फायदा भाजपला झाला होता. यापूर्वी २००७ च्या निवडणुकीत भाजप, शिवसेनेने स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. त्यावेळी भाजपला १४ तर शिवसेनेला ११ जागा मिळाल्या होता. २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेशी युती केल्याचा भाजपला फायदा झाला होता. आता २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली आहे. त्यामुळे याचा फायदा कुणाला होणार आणि फटका कुणाला बसणार?, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत भाजपकडे इच्छुकांची सर्वाधिक संख्या आहे. तब्ब ४७२ जणांंनी भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या. दुसरीकडे शिवसेनेने ३४७ जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी आता स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्ष सर्वच्या सर्व १०२ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.
--------------------------
रिपाइं (ए), रासपचे काय?
च्राज्यात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष आहे. शिवसेनेबरोबरची युती तुटली असली तर रिपाइं आणि रासपला सोबत घेऊन भाजप निवडणूक लढविण्याचे संकेत आहेत. रिपाइंने भाजपकडे १३ जागांची मागणी केली आहे. तर रासपने ४० इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असल्या तरी आमचे ज्या ठिकाणी प्राबल्य आहे, त्या ठिकाणच्या जागा आम्हाला द्याव्यात, अशी मागणी रासपने भाजपकडे केली आहे. यासंबंधी भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले, जे सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही महापालिका निवडणुकीच्या सामोरे जाणार आहेत.
---------------------
भाजप मनपाच्या सर्व जागा लढविणार असून वास्तववादी भूमिका घेऊन आमचे मित्रपक्ष रिपाइं (ए) आणि रासपला आम्ही सोबत घेऊ. खरंतर शिवसेनेने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. प्रमोद महाजन यांच्या विचारांची प्रतारणा करीत युती तोडली आहे. अजूनही वेळ गेली नाही, शिवसेना नेत्यांनी युतीबाबत फेरविचार करावा.
- प्रा. अशोक निंबर्गी
शहराध्यक्ष, भाजप
------------------------
महापालिका निवडणुकीत महाआघाडीत भाजपकडे आम्ही १३ जागांची मागणी केली आहे. ६ जानेवारीलाच आम्ही यासंबंधीचा प्रस्ताव दिला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या १० तर पंचायत समितीच्या २२ जागांची मागणी केली आहे. याबाबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे सांगितले आहे. अद्याप निरोप नाही.
- राजाभाऊ सरवदे,
प्रदेश सरचिटणीस, रिपाइं (ए)
------------------------------
मनपा निवडणुकीत महाआघाडीत राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष आहे. या निवडणुकीसाठी रासपकडे ४० इच्छुकांची उमेदवारी मागितली आहे. ज्या ठिकाणी आमचा पक्ष स्ट्रॉग आहे, त्या ठिकाणच्या जागा भाजपने आम्हाला सोडाव्यात अशी आमची मागणी आहे. भाजपने कोअर कमिटीची बैठक घेऊन निर्णय कळवू असे सांगितले आहे.
- विजयकुमार हत्तुरे,
जिल्हा प्रभारी, रासप
--------------------------------
भाजपबरोबरची आमची युती तुटली असून महापालिका निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार आहे. मनपा सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आमच्याकडे ३४७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, या सर्व इच्छुकांची बैठक शनिवारी सकाळी ११ वाजता जुनी मिल कंपौंडमधील शिवसेनेच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.
- प्रताप चव्हाण
शहरप्रमुख, शिवसेना