Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे. शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गटातर्फे बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार होती. मात्र पोलिस प्रशासनाने मतदान झाले तर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर आमदार जानकर यांनी स्थानिकाशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. तसेच शरद पवार हे देखील स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी मारकडवाडीत पोहोचले आहेत. यावरुनच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप लावला आहे.
मारकडवाडीत बॅलेटपेपरद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. दुसरीकडे, महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. मारकडवाडीतल्या घटनेनंतर शरद पवार हे स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी तिथे पोहोचले आहेत. शरद पवारांच्या भूमिकेवरु चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
"शरद पवार यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करायचा. त्यांनी पराभव झाला तर स्वीकारून घ्यायला हवा होता. पण जेव्हा पराभव स्वीकारता येत नाही तेव्हा काहीतरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं काम अशा प्रकारच्या कृत्यांमधून करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. विधानसभेमध्ये प्रचंड मोठा पराभव झाला. त्यांना जनतेने नाकारलं आणि म्हणून आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आहे. त्यामुळे यामधून जनतेची दिशाभूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपले डिपॉझिट वाचवण्याकरता शरद पवार धडपड करत आहेत. मारकडवाडीमध्ये आलेले लोक हे शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत. जनतेने विधानसभेला यांना दाखवून दिलं की लोकसभेचा खोटारडेपणा आता नाकारला आहे," असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
"विधानसभेला आम्हाला लोकांनी भरभरून मते दिली आहेत. मग एवढेच आहे तर मारकडवाडीमध्ये यापूर्वी ज्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमने मतदान झालं. त्या मतदानाची आकडेवारी बघितली तेव्हा का आक्षेप घेतले नाहीत. मारकडवाडीमध्ये एकदाच थोडी मतदान झालं आहे. अनेक निवडणुकांमध्ये मतदान झाले आहे. जाणीवपूर्वक या महाराष्ट्राला पुन्हा एकदा ईव्हीएमवर दोष देऊन अपयश लपवण्याचे पाप शरद पवार करत आहेत. जनतेला सारं समजलं आहे. राहुल गांधी, शरद पवार यांनी नौटंकी केली तरी महाराष्ट्र या नौटंकीला कंटाळला आहे. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्राला महायुतीकडून अपेक्षा आहेत. महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला प्रचंड ताकदवान करण्याकरता आम्ही काम करत आहोत," असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.