अक्कलकोट तालुक्यात भाजपा, काँग्रेसचे तगडे उमेदवार तयार
By Admin | Updated: January 24, 2017 20:34 IST2017-01-24T20:34:05+5:302017-01-24T20:34:05+5:30
अक्कलकोट तालुक्यात भाजपा, काँग्रेसचे तगडे उमेदवार तयार

अक्कलकोट तालुक्यात भाजपा, काँग्रेसचे तगडे उमेदवार तयार
अक्कलकोट तालुक्यात भाजपा, काँग्रेसचे तगडे उमेदवार तयार
शिवानंद फुलारी - अक्कलकोट आॅनलाईन लोकमत
नगरपरिषद निवडणुकीची चर्चा संपत नाही, तोपर्यंत होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात राजकीय वारे जोमाने वाहत आहेत. काँग्रेस, भाजपा नेते सर्व गट व गणातील कार्यकर्त्यांशी चर्चाअंती अंदाज घेत तगड्या उमेदवाराची नावे निश्चित करीत आहेत. या सर्व घडामोडीत भाजपाने पुन्हा एकदा युवक फळी घेऊन तर काँग्रेस ‘वन मॅन शो’ने निर्णय घेत आहे. सर्वात कहर म्हणजे राष्ट्रवादीची अवस्था ‘तळ्यात-मळ्यात’ अशी झाली आहे. एकूणच कोणत्याही पक्षाने धाडसाने उमेदवारी जाहीर न करता एकमेकांवर डोळा ठेवून सावध भूमिका घेत आहेत.
महिनाभरापूर्वी तालुक्यातील अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या तिन्ही नगरपरिषदांच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. यामुळे ग्रामीण भागातील जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी नियोजनबद्ध आखणी करत सुसाट सुटलेले आहेत तर या निवडणुकीत दूध पोळल्याने काँग्रेसवर ताक फुंकून पिण्याची वेळ आली आहे. शिवसेना, मनसे, रिपाइं, रासप या पक्षांना कोणताच पक्ष विचारात घेत नसल्याने ते आघाडी करून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या टप्प्यात भाजपाने सहा गट, बारा गणांसाठी इच्छुकांची नावे नोंदवून घेणे, मुलाखती घेणे ही प्रक्रिया पूर्ण केली. त्याउलट काँग्रेसने असा गाजावाजा न करता गुप्तपणे मोठ्या गावात जाऊन बैठका घेऊन निर्णय घेत उमेदवार निश्चित करीत आहेत. यामुळे इच्छुकांमध्ये उमेदवारी मला मिळते की नाही, अशी शंका उपस्थित झाली आहे. ते वरिष्ठांकडे फिल्डिंग लावत आहेत. काँग्रेसचा निर्णय आ. सिद्धाराम म्हेत्रे तर तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, जि.प. माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, माजी पं. स. सदस्य मोतीराम राठोड, विद्यमान नगरसेवक महेश हिंडोळे, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी ही भाजपातील युवक मंडळी चर्चाअंती सर्वानुमते निर्णय घेत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप सिध्दे, फारूक शाब्दी, तालुकाध्यक्ष राजीव क्षीरसागर यांची याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. एकमेव माजी उपसभापती मल्लिकार्जुन पाटील यांची धडपड चालू असून, राष्ट्रवादीचा सर्वस्वी निर्णय अकलूजकरांवर विसंबून आहे. यामुळे राष्ट्रवादीची अवस्था तळ्यात - मळ्यात आहे.
-----------------------------
यांचे-त्यांचे सुत जुळेना
काँग्रेस, भाजपाने जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे घाईगडबडीने घोषित न करता एकमेकांच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. यामुळे धाडसाने कुणीच उमेदवारी जाहीर करताना दिसून येत नाही.
दुधनी बाजार समिती व तिन्ही नगरपरिषदा निवडणुकीपासून सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व इतर मंडळी यांच्यात व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्यामध्ये खटके उडाले असून, अद्यापही त्यांचे सुत जुळले नाही. भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीप्रसंगी पाटलांचे पुत्र शिवानंद पाटील व संजीवकुमार पाटील यांनी उपस्थिती लावून मुलाखत दिली. यानंतरही भाजपातील नेतेमंडळी त्यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक नाहीत. पाटील पिता-पुत्र नगरपरिषद व दुधनी बाजार समिती निवडणुकीत पक्षाला मदत केली नसल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढविली आहे.
----------------------
माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांचे काय?
माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांच्यावर नाराज असलेली भाजपातील युवक मंडळी त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस करीत नाहीत व त्यांना जुळवूनही घेत नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यात मंगरूळ जि.प.मधील तिन्ही जागेत पाटील विरुध्द भाजपा असा सामना होण्याची व काँग्रेसने पाटील यांना छुपा पाठिंबा दर्शवण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे म्हेत्रे-पाटील यांच्यामध्ये गुप्तगूही झाली आहे.
----------------------------
उमेदवारीसाठी खलबत्ते !
भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वागदरी जि. प. गटासाठी भाजपाकडून आनंद तानवडे, शिरवळ गणासाठी सरपंच राजकुमार बंदिछोडे, वागदरी गणासाठी विजयकुमार ढोपरे यांचे तर काँग्रेसकडून रवींद्र घोळसगाव, शिरवळ गणासाठी बाजीराव खरात, वागदरी गणासाठी माजी सरपंच रवी वरनाळे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. चपळगाव पंचायत समिती गणातून बऱ्हाणपूरचे अब्दुल खय्युम बशीर पीरजादे हे भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहेत. नागणसूर भाजपाकडून मंजुनाथ प्रचंडे यांच्या पत्नी वीणाश्री प्रचंडे, तोळणूर गणासाठी काशिनाथ प्रचंडे यांचे नाव जवळ जवळ निश्चित मानले जात आहे. नागणसूर गणासाठी निंगण्णा पुजारी, शिवलाल राठोड यांच्यात रस्सीखेच चालू आहे. काँग्रेसकडून जि. प. साठी मल्लिनाथ गु. भासगी, तोळणूर गणासाठी मंजुनाथ तेली, नागणसूर गणासाठी ननवरे यांचे नाव अंतिम समजले जात आहे. जेऊर गट व गणासाठी भाजपाकडून विवेकानंद उंबरजे, माजी उपसभापती शिवप्पा देसाई, दहिटणे गणासाठी भाजपाकडून रमेश व्हसुरे, ग्रा. पं. सदस्य प्रदीप पाटील, शिवशंकर चनशेट्टी तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मल्लिकार्जुन पाटील, मल्लिकार्जुन काटगाव,दहिटणे गणासाठी गोकुळ शिंदे, विलास गव्हाणे यांच्या नावांची चर्चा आहे व उर्वरित चपळगाव, सलगर, मंगरूळ या तीन गट व गणांसाठी दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू आहे.