करवसुली करणाऱ्या ग्रामसेवकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:22+5:302021-02-05T06:46:22+5:30
सोलापूर : ग्रामपंचायतीच्या कराची वसुली करण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला थोबाडीत मारून वसुली पथकाला मारहाण करण्यात आली. हा प्रकार शनिवारी दक्षिण ...

करवसुली करणाऱ्या ग्रामसेवकाला मारहाण
सोलापूर : ग्रामपंचायतीच्या कराची वसुली करण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला थोबाडीत मारून वसुली पथकाला मारहाण करण्यात आली. हा प्रकार शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगाव येथे घडला.
तालुक्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी आणि पाणीपट्टी कराची थकबाकी सातत्याने वाढत आहे. गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी मोहीम सुरू केली. स्थानिक ग्रामसेवकाच्या मदतीला पथक नियुक्त करण्यात आले. शनिवारी वरळेगाव येथील ग्रामसेवक सोमनाथ कोले यांच्यासह पथक वसुलीसाठी फिरताना राघवेंद्र शिवाजी मळगे याने तुम्हाला कर वसुलीची परवानगी कुणी दिली. गावात का फिरता असाच जाब विचारत ग्रामसेवक सोमनाथ कोले यांच्या थोबाडीत मारली. त्यानंतर वसुली पथक आणि राघवेंद्र मळगे यांच्यात हाणामारी झाली.
मळगे याने पथकातील बाळासाहेब चौगुले, दिगंबर कल्याणकर, सचिन माशाळे, शरणप्पा तोळणुरे, ग्रामपंचायत शिपाई श्याम मळगे यांनाही मारहाण केली. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात मळगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपीवर पोलीस कारवाई करण्यात आली नाही, अशी तक्रार दक्षिण सोलापूर तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नागसेन कांबळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.