माणूस बना, सांगतोय कोरोना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 01:11 PM2020-05-07T13:11:00+5:302020-05-07T13:11:06+5:30

जो निसर्ग माणसाला पिढ्यान्पिढ्यांपासून  दोस्तीचा, मैत्रीचा हात पुढे करतोय त्या निसर्गाचा हातच तोडून घेण्याचा प्रयत्न माणसानं केला.

Be a man, says Corona ...! | माणूस बना, सांगतोय कोरोना...!

माणूस बना, सांगतोय कोरोना...!

Next

कोरोना या महामारीनं जगात हाहा:कार माजवला आहे. कधी नव्हे ते विमानाचं, रेल्वेचं, साºयाच यंत्रांची चाकं जागेवर थांबविली या कोरोनानं. हे कमी झालं की काय म्हणून साºया साºया देवांना, अल्लाहला कुलूपबंद व्हावं लागलं. अनेक लग्नं थांबली. अंत्ययात्रेलासुद्धा चोरून जाता येईना. भारतात ४९,४०० बाधित असून, आजवर १,६९३ जण बळी गेलेत. उभ्या मानवजातीनं सारा निसर्ग ओरबाडून टाकला. नद्या बुजवल्या, समुद्र पुढे ढकलले, डोंगर, पर्वत होत्याचे नव्हते केले. ‘लवासा’सारखी शहरं यातून निर्माण झाली. प्राणिमात्रांचं तर विचारूच नका. ज्या चीनमधून कोरोनाचा उदय झाला त्या चीननं नको ते खाल्लं. कोंबडी, बकरी, जनावरं, मांस, मच्छी तर खाल्ली पण, घोरपडी, खेकड्याबरोबरच साप, पाली, उंदीर, झुरळंसुद्धा खाल्ली  अन् मग मात्र निसर्गाचा पारा चढला.

जो निसर्ग माणसाला पिढ्यान्पिढ्यांपासून  दोस्तीचा, मैत्रीचा हात पुढे करतोय त्या निसर्गाचा हातच तोडून घेण्याचा प्रयत्न माणसानं केला. मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरात माणसांना राहायला जागा कमी पडायला लागली म्हणून खडी, माती, सिमेंटचे ठोकळे टाकून समुद्र पुढे ढकलला. चंद्रकोर मणिहारसारखा मरीन लाईन मार्ग तयार केला. मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले, २६/११ चा हल्ला झाला. तरी मुंबई क्षणभरही थांबली नाही. परंतु कोरोनाने मुंबई थांबवून एक महिना होऊन गेलाय, आता तरी माणसाने माणूस बनायचा प्रयत्न केला पाहिजे.

आई-वडिलांना, नातेवाईकांना विसरणारा दिल्ली, पुण्या-मुंबईचा माणूस आज खेड्यात, गावाकडे आलाय, अडकून पडलेला येऊ पाहतोय. शहरातल्या ‘एसी’त राहणारी माणसं आज छपरातील अन् झाडाखालची हवा, सावली चांगली म्हणून गोड मानून घेताहेत. पुण्या-मुंबईत नोकरी करणारा ‘नवरा’ पाहिजे म्हणणाºया पोरी आज ‘मला ममईचा नवरा नको गं बाई’ म्हणायला लागल्यात. असं असलं तरी आपले हे लोक ‘माणूस’ बदलायला तयार नाहीत. आपली सेवा अहोरात्र करणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अन् घरादारापासून, लेकरा-बाळांपासून दूर राहून उन्हातान्हात उभा राहून आपले रक्षण करणाºया पोलिसांवर हल्ला करणारी माणसं, महाराष्टÑापासून ते हरयाणापर्यंत दिसताहेत.

माणसानं हवेचं प्रदूषण केलं, ध्वनीचं प्रदूषण केलं, पाण्याचं प्रदूषण केलं, झाडं तोडली आणि म्हणून ‘ओझोन’चा स्तर वितळू लागला अशी तक्रार पर्यावरणप्रामी, खगोलशास्त्रज्ञ यांनी वारंवार केलेली होती. परंतु याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. ‘कोरोना’च्या लॉकडाऊनमुळे सारी यंत्रं थांबली, सगळी चाकं थांबलीत. पवित्र समजल्या जाणाºया गंगा नदीपासून ते आमच्या पंढरपूर येथील चंद्रभागापर्यंतच्या सर्व नद्या आज स्वच्छ होत आहेत. दिल्लीच्या वाहनांचा धूर आहे की वाहनांच्या धुरात, धुळीत दिल्ली आहे हे कळत नव्हतं. आमच्या सोलापूरची तºहाही यापेक्षा वेगळी नव्हती. परंतु आमचं सोलापूर आज प्रदूषणमुक्त होतंय.

कोरोनामुळे खरं मोकळा श्वास घेतलाय तो जलचर प्राणी, पक्षी, जंगली, हिंस्र प्राणी यांनी. मुंबईच्या भर चौकात येऊन मोर आज थुई थुई नाचताना दिसताहेत. सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक थांबले अन् त्यांची जागा आज बदकांनी घेतली. मंदिराचा गाभारा बदकांनी भरलेलं छायाचित्र आम्हाला ‘लोकमत’नं दाखविलं. ही सारी किमया एका महाभयानक अशा सूक्ष्म कोरोनाने करून दाखविली. या कोरोनाला निमंत्रण आपणंच दिलंय. ‘माणूस’ माणुसकी शून्य झाला म्हणून कोरोना आला. तो आला अन् त्याने सारं जग व्यापून टाकलं. 

आता तरी आपण देव देवळात नाही, मंदिरात नाही, चर्चमध्ये नाही, मस्जिदीमध्ये नाही, आगºयात नाही तर आई-वडिलांमध्ये आहे. वृद्ध माणसात आहे. अंध, दिव्यांग, अधू माणसात आहे. अंध, मूकबधिर, मतिमंद, दिव्यांगात आहे. लहान लेकरात आहे. गायीच्या वासरात आहे. शेळीच्या कोकरात आहे. घोड्याच्या शिंगरात आहे. झाडावरच्या पाखरात आहे. हे आम्ही ओळखलं पाहिजे. तसं कळलं पाहिजे. तसं वागलं पाहिजे. यासाठी पहिल्यांदा आम्ही माणसातला माणूस शोधला पाहिजे. त्यासाठी आम्ही ‘माणूस’ झालं पाहिजे, लोक माणूस नाहीत ते माणूस बनण्याची प्रक्रिया आजपासून तरी सुरू करतील, ही अपेक्षा बाळगतो.
- अण्णासाहेब भालशंकर
(लेखक शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: Be a man, says Corona ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.