बार्शी काँग्रेसने सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:21 IST2021-03-19T04:21:05+5:302021-03-19T04:21:05+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत ...

बार्शी काँग्रेसने सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. १७ रोजी सोलापूर जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. त्यावेळी बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये कशाप्रकारे रणनीती आखावी याबाबत सविस्तर चर्चा केली.
बार्शीचे शहराध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे यांनी तालुक्यातील संघटना वाढीबाबत परिस्थिती सांगितली. ॲड. आरगडे म्हणाले, बार्शी मतदारसंघ हा तीन भागात विभागला गेला आहे. त्यामध्ये पहिला बार्शी शहर ज्यामध्ये 'अ' वर्गाच्या नगर परिषदेचा समावेश आहे. एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. दुसरा वैराग भाग ज्यामध्ये लवकरच वैराग नगर पंचायत होत आहे. तिसरी उत्तर बार्शी ज्यामध्ये १३७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे, असे सांगितले.
त्यानंतर नाना पटोले यांनी बार्शीतील लहानसहान घडामोडीवर बारीक लक्ष आहे. माझी गुप्त यंत्रणा मला अहवाल देत असते. राज्यातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना मी विशेष करून आपल्या जिल्ह्यात लक्ष द्यायला सांगेन तुम्ही ताकतीने तुमची कामे करा लोकोपयोगी कामावर लक्ष द्या. आगामी काळात काँग्रेस कोणाशीही युती आघाडी करणार नाही. त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार रहा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार बसवराज पाटील, युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे-पाटील, हुसेन दलवाई, माजी महिला प्रदेश अध्यक्षा ॲड. चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, धवलसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते उपस्थित होते.