सोलापूर : हालाखीची परिस्थिती असलेल्या बांगलादेशातून काम करून जगण्यासाठी ऐपतीप्रमाणे ८ ते १० हजार किंवा त्याही पेक्षा जास्त पैसे देऊन भारतात प्रवेश मिळवतात. तेथून ते एखाद्या कारखान्यात कामासाठी वास्तव्य करतात, तेथेच स्थानिक लोकांच्या मदतीने स्वतःचे आधारकार्ड तयार करून घेतात अन् देशात फिरण्याचा कायमचा परवाना मिळवतात, अशी माहिती तपासात पुढे येत आहे.बांगलादेशातील काही लोकांना पैसे देऊन देशाच्या सीमेवरून भारतात आणले जाते. तेथून त्यांना एका ठिकाणी कामाला लावले जाते. थोडा कालावधी गेल्यानंतर ते देशभरात कामाच्या शोधात निघतात. यांना काम मिळवून देणारा एक ठेकेदार असतो, त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. जिथे कामरागाची गरज असते, तिथे त्यांना बोलावले जाते. कोणत्याही परिस्थितीमध्ये राहून काम करण्याची त्यांची तयारी असते. कमी पगारामध्ये कामगार मिळतो, म्हणून त्यांना लगेच कामावर ठेवले जाते. सोलापुरात बांगलादेशींनी प्रवेश केला. एका पाठोपाठ एक आलेल्या या बांगलादेशी तरुणांना एका हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. १२ पैकी ५ जण १५ दिवसांपूर्वी सोलापुरात आले होते. काही कामगार २ ते ४ महिन्यांपासून काम करीत होते, तर एकजण ८ महिन्यांपासून काम करीत होता. ठेकेदारासह अन्य एकाला अटक केल्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या १४ झाली आहे.
सहा महिन्यांची शिक्षा; पुन्हा बांगलादेशात रवानगी
घुसखोरांना अटक केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी मिळते. चौकशीनंतर न्यायालयीन कोठडी दिली जाते. खटला चालवला जातो. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर संबंधित घुसखोरांना सहा महिन्यांची शिक्षा होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या देशात सोडण्यात येते, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली.