जून-जुलैमध्ये बळीराजा आनंदाला... ऑगस्टमध्ये हिरमुसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:28+5:302021-09-02T04:48:28+5:30
जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यापासून चांगला पाऊस पडत असला तरी २५ जुलै ते १८ ऑगस्टदरम्यान २४ दिवस पावसाने दडी मारली. ...

जून-जुलैमध्ये बळीराजा आनंदाला... ऑगस्टमध्ये हिरमुसला
जिल्ह्यात यावर्षी जून महिन्यापासून चांगला पाऊस पडत असला तरी २५ जुलै ते १८ ऑगस्टदरम्यान २४ दिवस पावसाने दडी मारली. पाऊस लांबल्याचा फटका खरीप पिकांना चांगलाच बसला. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ३०५ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३५९ मिमी पाऊस पडला. म्हणजे सरासरीच्या ११७.८ टक्के पाऊस जून- जुलै महिन्यात पडला.
ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात १०७.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना अवघा ७८.४ मिमी म्हणजे ८६.२ टक्के इतकाच पाऊस पडला. मात्र, जून, जुलै या दोन महिन्यांत १९७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना २७३ म्हणजे १३८.४ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यातील ९२ मंडळांत सरासरीच्या ११७.८ टक्के इतका पाऊस पडला असला तरी २५ मंडळांत १०० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
कमी पाऊस झालेल्या मंडलांत उपळे दुमाला, गौडगाव, पांगरी, सुर्डी व खांडवी (बार्शी), तडवळ, दुधनी, मैंदगी, किणी (अक्कलकोट), कुर्डूवाडी, रांजणी (माढा), भाळवणी, पटवर्धन कुरोली (पंढरपूर), करमाळा, केम, जेऊर, कोर्टी, उमरड, केत्तूर (करमाळा), इस्लामपूर, सदाशिवनगर, दहिगाव, नातेपुते, अकलूज, लवंग (माळशिरस) यांचा समावेश आहे.
-----
पाच मंडळांत सर्वाधिक पाऊस
मंगळवेढा मंडळात सर्वाधिक १९१ टक्के पाऊस पडला आहे. महाळुंग मंडळात १९१ टक्के, मारापूर १६३ टक्के, कामती १५९ टक्के, शेटफळ १५१ टक्के इतका पाऊस पडला आहे. मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक १४२.५ टक्के, मोहोळ तालुक्यात १३०.४ टक्के, सांगोला १२५.५ टक्के, उत्तर तालुक्यात १२१.२ टक्के, पंढरपूर ११८.४ टक्के, माढा ११४.२ टक्के, दक्षिण सोलापूर ११४.९ टक्के, बार्शी १०८.४ टक्के, अक्कलकोट १०३ टक्के, माळशिरस १००.९ टक्के, करमाळा ९८.४ टक्के, याप्रमाणे पाऊस पडला आहे.
----
सोयाबीन, मूग, उडदाला फटका
- ऑगस्ट महिन्यात प्रदीर्घ काळ पावसाने ओढ दिली. याच काळात खरिपातील पिके जोमात होती. पावसाची गरज होती. सोयाबीन, उडदाने माना टाकल्या. यामुळे किमान २५ ते ४० टक्के उत्पादनावर परिणाम झाला. ‘देवानं दिलं.. पावसानं नेलं’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.
-----