विकासकामांच्या मुद्यांमुळे बबनराव शिंदे
By Admin | Updated: October 21, 2014 13:58 IST2014-10-21T13:58:17+5:302014-10-21T13:58:17+5:30
माढा तालुक्यातील मतदारांनी विकासाला मतदान करण्याच्या बबनराव शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ९७ हजार ८0३ मते मिळविली.

विकासकामांच्या मुद्यांमुळे बबनराव शिंदे
इरफान शेख/अय्युब शेख■ माढा
माढा तालुक्यातील मतदारांनी विकासाला मतदान करण्याच्या बबनराव शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ९७ हजार ८0३ मते मिळविली. ३५ हजार ७७८ इतके मताधिक्य मिळाले. अनेक विकासकामांच्या मुद्यांमुळे जनतेने त्यांना पाचव्यांदा प्रचंड बहुमताने निवडून दिले.
आ.शिंदे यांनी गेल्या २५ ते ३0 वर्षांच्या काळात जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक, जिल्हा परिषद व विधानसभेत २0 वर्षे काम करताना साखर कारखानदारी, सिंचनाचे प्रकल्प व उसाचा दर यासह अनेक क्षेत्रात केलेले काम पाचव्या विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या कामाला आले.
माढा मतदारसंघात आ.बबनदादा शिंदेंचा रथ रोखण्यासाठी दस्तुरखुद्द शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी करकंब येथे सभा घेतली. काँग्रेसच्या वतीने नारायण राणे व हर्षवर्धन पाटील यांनीही सभा घेतल्या; मात्र या दोघांनाही आपला मतदारसंघ ताब्यात ठेवता आला नाही, पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
सर्व विरोधकांनी आ.बबनदादा शिंदे यांनाच आपल्या प्रचारात टार्गेट केले होते. अमुक विकास झाला नाही, तमुक विकास झाला नाही असा ऊहापोह सर्वांनी केला होता. याला कसलेही उत्तर न देता केवळ विकासकामांविषयीच आपल्या प्रचारसभेत आ.शिंदे यांनी उल्लेख ठेवला. एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांनाही टीकेला उत्तर देऊ दिले नाही. आपल्या विकासावर आपला विश्वास आहे ना मग म्हणू द्या विरोधकांना काय म्हणायचे आहे ते असे ते सांगत.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वतीने आ.बबनदादा शिंदे, शिवसेनेच्या वतीने शिवाजीराव सावंत, काँग्रेसच्या वतीने कल्याणराव काळे व भाजप पुरस्कृत दादासाहेब साठे या चारही उमेदवारांचे साखर कारखाने असल्याने जिल्ह्यातील लक्षवेधी लढत होती. उसाचा दर, खताचे वाटप, त्या माध्यमातून केली जाणारी विकासकामे हे मुद्दे प्रामुख्याने चर्चिले गेले; मात्र विरोधकांना यावरही टीका करायची संधी शिंदेंनी दिली नाही.महायुतीतून शिवसेना वेगळी झाली. आघाडीत बिघाडी होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले यामुळे उमेदवारांची गर्दी झाली, तरीही आ.शिंदे यांचे मताधिक्य कमी करण्यात सर्वांना अपयश आले. काँग्रेसच्या मताचा टक्का काही प्रमाणात वाढला. काँग्रेसचे कल्याणराव काळे यांना ६२ हजार २५ मते मिळून ते दुसर्या क्रमांकावर राहिले तर शिवसेनेचे शिवाजी सावंत यांना ४0 हजार ६१६ मतांवर समाधान मानावे लागले. दादासाहेब साठे यांना केवळ १४ हजार १४९ मतेच मिळाली. त्यांची अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत.
सीना-माढा उपसा सिंचन योजना बबनराव शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत यशस्वीपणे चालवून दाखवली. कुंभेज- खैरावमधील सीना नदीवर पुलाचा प्रश्न ८ कोटी रुपये मंजूर करून त्यांनी मार्गी लावला. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावातील रस्त्यांचा प्रश्न पंतप्रधान सडक योजना मार्गी लावली. १४ गावाच्या घडामोडींवरही आ.शिंदे यांनी मात केली.
विकासाचा मुद्दा प्रभावी
■ आ.बबनदादा शिंदे हे केलेली विकासकामे सांगून, उर्वरित विकासकामे मार्गी लावू असे जनतेला ठासून सांगत होते. प्रत्येक गावात त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. इतर उमेदवारांचा जनसंपर्क मतदारसंघाच्या प्रत्येक भागात त्या प्रमाणात नव्हता. त्यांनी राहिलेला विकास जनतेसमोर मांडण्याला प्राधान्य दिले. प्रत्येक उमेदवाराला आपापल्या भागात मताधिक्य मिळाले; मात्र आ.बबनदादा शिंदे यांना सर्वच भागातून आघाडी मिळाली.