बार्शीत राजेंद्र राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष
By Admin | Updated: February 1, 2017 18:22 IST2017-02-01T18:22:19+5:302017-02-01T18:22:19+5:30
बार्शीत राजेंद्र राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष
बार्शीत राजेंद्र राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष
बार्शीत राजेंद्र राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष
शहाजी फुरडे-पाटील - बार्शी आॅनलाईन लोकमत
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपल्याच हातात पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सूत्रे यावीत, यासाठी गुप्त खलबताद्वारे रणनीती आखत असताना तालुक्याच्या राजकारणात येत्या एक-दोन दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी होऊन उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ राज्यातील महायुती तुटल्याने बार्शी तालुक्याच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार, असे दिसू लागले आहे़ याचदरम्यान शिवसेना युतीसाठी तयार न झाल्यास राजेंद्र राऊत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेणार की अपक्ष लढणार, याकडे तालुक्याच्या नजरा लागल्या आहेत़
दोन्ही राजकीय पक्ष उमेदवारी नेमक्या कोणत्या गावात, कोणाला द्यायची हे गणित मांडत असताना राष्ट्रवादीचे आ़ दिलीप सोपल व शिवसेनेचे राजेंद्र राऊत ही नेतेमंडळी निवडणुकीसाठी जनसंपर्काबरोबरच अर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत़
बार्शी तालुक्यात जि़प़च्या सहा तर पंचायत समितीच्या बारा जागा आहेत़ या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीही झाली आहे, मात्र राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला किती जागा, हे अद्याप दोन्ही काँग्रेसने जाहीर केलेले नाही़ राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेससाठी जागा सोडणार की काँग्रेसच्याच उमेदवाराला त्यांच्या हातात घड्याळ बांधायला लावणार हेदेखील अद्याप गुलदस्त्यातच आहे़ गेल्या पंधरा दिवसांपासून आ़ दिलीप सोपल यांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली असल्याचे त्यांच्या हालचालीवरुन दिसून येत आहे़
इकडे शिवसेनेमध्येदेखील वातावरण काहीसे गंभीर झाल्याचे जाणवत आहे़ शिवसेनेचे माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी जिल्ह्यातील आघाडीसंदर्भात चर्चा सुरु ठेवल्याने तसेच सहकारमंत्र्यांनीदेखील जिल्ह्यातील निवडणूक ही आघाडी करुन कोणत्या तालुक्यात कोणत्या नेत्याने कोणत्या चिन्हावर लढवायची आहे, याबाबत विचारमंथन सुरु असल्याचे सांगितले आहे़ त्यामुळे जिल्ह्याबरोबरच तालुक्यात कोणाला कोणते निवडणूक चिन्ह मिळणार याचीदेखील मोठी उत्सुकता लागली आहे़
माजी आ़ राजेंद्र राऊत हे बार्शी तालुक्यात भाजपाबरोबरच युती करण्याच्या मूडमध्ये आहेत, मात्र त्यांच्या या भूमिकेबाबत अद्याप शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी होय़़ नाही़़ असे काहीही सांगितलेले नाही़ त्यामुळे राऊत यांच्या भाजपाबरोबरच युतीच्या धोरणाला शिवसेना संमती देणार की नाही आणि जर शिवसेनेने संमती दिली नाही तर राऊत पुढे कोणते धोरण अवलंबणार, याबाबत तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु आहे़ या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत हे काय निर्णय घेणार यावरच या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे़याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी राऊत गटाने गुरुवार, दि़ २ रोजी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे़
पैशाचा चुराडा..
निवडणूक अन् पैसा हे समीकरण तयार झाले असून, निवडणूक आयोगाने कितीही काटेकोर नियम लावले तरी राजकीय पक्ष व उमेदवार कोट्यवधी रुपये निवडणुकीवर खर्च करीत असतात, त्यामुळे गरीब कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचे दिवस आता संपले आहेत, त्यामुळे दोन्ही राजकीय पक्ष हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कार्यकर्त्यांना किंवा ज्याठिकाणी महिला आरक्षण आहे अशा ठिकाणी अधिकारी किंवा उद्योजक असलेल्याच्या पत्नी किंवा आईला मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत़ त्यामुळे नोटाबंदी असली तरी पैशाचा मात्र भरपूर चुराडा निवडणुकीत होणार हे खरे आहे़
शिवसेना की भाजप ?
राजेंद्र राऊत हे गुरुवारच्या बैठकीत तालुक्याच्या व त्यांच्या भवितव्यासाठी कोणता निर्णय घेणार, ते शिवसेनेत राहून महायुती करणार की युती न झाल्यास भाजपचे कमळ तालुक्यात फुलविणार आणि तसे झाल्यास उरल्यासुरल्या शिवसेनेची काय भूमिका राहणार याकडे राजकीय कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत़