सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न, सासरा अटकेत सासू नणंद गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:03+5:302021-09-02T04:48:03+5:30
पोलीस सूत्रांनुसार मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील प्रांजली निरंजन उकळे (वय ३५) या महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले ...

सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न, सासरा अटकेत सासू नणंद गायब
पोलीस सूत्रांनुसार मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील प्रांजली निरंजन उकळे (वय ३५) या महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मृत व्यक्तीच्या नावे तीन एकर शेतजमीन आहे. प्रांजलीचे सासरे भीमराव धर्मा उकळे, सासू मीनाक्षी भीमराव उकळे व नणंद सोनाली नागनाथ भिंगे (सर्व रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) हे सदरची शेतजमीन आमच्या नावे कर म्हणून अधूनमधून वाद करत होते. त्यातूनच २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान सासरे भीमराव व सासू मीनाक्षी, नणंद सोनाली यांनी आमच्या घरी चल, जेवण करू, असे म्हणून प्रांजली हिला तिच्या घरातून त्यांच्या घरासमोर नेले. तेथे आमचा मुलगा या जगात राहिला नाही, मुलाचे नावे असलेली शेती आमच्या नावावर करून दे, असे म्हणत भांडण काढले. प्रांजलीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सासूने घरातून बाटलीत पेट्रोल भरून आणले व प्रांजलीच्या अंगावर, तोंडावर ओतले. सासरे भीमराव यांनी काडेपेटीने पेटवून दिले. त्यामध्ये प्रांजली ही गंभीर भाजली. तिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी नेले.
----
सासऱ्याला पोलीस कोठडी
या प्रकरणी सासू-सासरे व नणंद अशा तिघांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात २९ ऑगस्ट रोजी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदला आहे. तपासी अधिकारी सुधीर खारगे यांनी घटनास्थळी धाव घेत सासऱ्यास अटक करून. मंगळवारी मोहोळ येथील न्यायालयात हजर केले असता त्याला ३ सप्टेंबरपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.