एटीएमविना बँकेतून १० हजार लाटले
By Admin | Updated: June 11, 2014 00:27 IST2014-06-11T00:27:30+5:302014-06-11T00:27:30+5:30
सांगोल्यातील घटना: ग्राहकाची तक्रार

एटीएमविना बँकेतून १० हजार लाटले
सांगोला : येथील बँक आॅफ इंडिया या बँकेत स्वत:चे ए.टी.एम. व कोणालाही विड्रॉल स्लीप भरून दिली नसतानाही संबंधित खातेदाराची खात्यावरुन दोन दिवसांपूर्वी परराज्यातील ठकसेनाने दहा हजार रुपयांची रक्कम काढून घेतली आहे. या प्रकारामुळे खातेदारांसह बँक कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
शिवणे येथील शिवाजी जनार्धन घाडगे यांचे बँक आॅफ इंडियाच्या शाखेत ०७४९२०११००००२५३ या क्रमांकाचे बचत खाते आहे. शनिवारी सायंकाळी ५.०७ वा.च्या सुमारास मध्यप्रदेशातील अमित गुप्ता या ठकसेनाने त्यांच्या खात्यातून पाच हजार रुपये काढून घेतले.
रक्कम काढून घेतल्यानंतर 0७५४२९७२८२२ या क्रमांकाच्या मोबाईलवरुन त्याने शिवाजी घाडगे यास फोन करुन आणखी रक्कम काढणार असल्याची धमकीही दिली. सुरुवातीला शिवाजी घाडगे यांना आपली कोणीतरी मस्करी करीत असल्याचे वाटले. मात्र रविवारी बँक बंद असूनही पुन्हा पाच हजारांची रक्कम काढल्याचा संदेश घाडगे यांच्या मोबाईलवर प्राप्त होताच त्यांना याविषयी खात्री पटली.
परराज्यातील ठकसेनाने आपल्या खात्यातून दहा हजार रुपयांची रक्कम काढल्याने घाडगे चांगलेच धास्तावले. याबाबत सोमवारी त्यांनी बँकेचे शाखाधिकारी चंदनशिवे यांची भेट घेऊन तपासले असता खात्यातून दहा हजार रुपये गायब झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी घाडगे यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर अमित गुप्ता ला संपर्क साधल्यानंतर त्याने शाखाधिकाऱ्यांना जुमानले नाही. घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे कळवली. मंगळवारी शिवाजी घाडगे यांनी पुन्हा बँकेला भेट देउन कारवाईची मागणी केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन तक्रार दाखल करु, असे आश्वासन मिळाले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.