धकाधकीमुळे माणूस यंत्रवत : अशोककुमार
By Admin | Updated: September 4, 2014 01:14 IST2014-09-04T01:14:33+5:302014-09-04T01:14:33+5:30
उद्योग बँक व्याख्यानमाला

धकाधकीमुळे माणूस यंत्रवत : अशोककुमार
सोलापूर : आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे माणूस भावनाशून्य झाला आहेच, त्याचबरोबर हसणं, आनंद, सुख, दु:ख सगळे विसरून माणूस कधी मशीन झाला, हे जगाला कळलेच नाही़ यामुळे माणूस दैनंदिन जीवनातील आनंदाला मुकत असल्याने त्याच्या वाटेवर काटे निर्माण होत असल्याने त्याचे जगणे यंत्रवत झाल्याची खंत हास्य कलावंत एन. अशोककुमार यांनी व्यक्त केली.
उद्योग बँक गणेशोत्सव व्याख्यानमालेत हसरी मैफील या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. एरव्ही बाहेर रूबाबात वावरणारा पती घरी आल्यावर आपल्या पत्नीसमोर कसा बकरा होतो आणि मुले आपल्या पित्याचा आदर न करता बिनदिक्कतपणे कशी वागतात हे साभिनय विनोदाद्वारे सादर केले. यावेळी सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले. सध्या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करताहेत. पूर्वीच्या अबला आता सबला झाल्याने त्यांना समाजातील सर्व घडामोडींविषयी माहिती मिळत असून, संसाराचा गाडा हाकताना पती व पत्नीमध्ये किरकोळ कारणातून होणाऱ्या भांडणातून कसे विनोद निर्माण होतात, हे सांगताच सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. आरक्षणामुळे महिलांना राजकारणात जाण्याची संधी मिळत आहे. त्या पुरूषांबरोबरच राजकारण्यांची भाषा बोलत आहेत. यामुळे होणाऱ्या विनोदाचा त्यांनी उदाहरणासह स्पष्टीकरण केले. पतीच्या जागी सरपंच झालेल्या पत्नीसमोर पती ‘पतीत्वाचा राजीनामा देऊ का’ असे म्हणताच त्याच तोऱ्यात ‘विचार कशाला करता, देऊन टाका’ असे म्हणताच होणाऱ्या विनोदाने तर श्रोते खळखळून हसले. त्यांनी एकपात्री विनोदी ७५ भूमिका सादर केल्या.