शेतीपंपाची ४१० कोटी रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:46+5:302021-02-05T06:46:46+5:30

महावितरण कंपनीचे सांगोला तालुक्यात शेतीपंपाच्या ३३ हजार १८९ ग्राहकांकडे सुमारे ४१० कोटी थकबाकी असून, यामध्ये १० कोटी चालू बिलाची ...

Arrears of Rs 410 crore for agricultural pumps | शेतीपंपाची ४१० कोटी रुपयांची थकबाकी

शेतीपंपाची ४१० कोटी रुपयांची थकबाकी

महावितरण कंपनीचे सांगोला तालुक्यात शेतीपंपाच्या ३३ हजार १८९ ग्राहकांकडे सुमारे ४१० कोटी थकबाकी असून, यामध्ये १० कोटी चालू बिलाची बाकी आहे. शासनाकडून थकबाकी बिलात व्याज, विलंब आकार माफ करता शेतकऱ्यांना २७० कोटी थकबाकीत ५० टक्के सवलत मिळणार आहे. कृषी पंप धोरणाची १८ डिसेंबर २०२० पासून अंमलबजावणी चालू झाली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत तीन वर्षांचा कालावधी असणार आहे. कृषी धोरणानुसार २०२२ मार्चपर्यंत ५० टक्के बिल भरल्यास शेतकऱ्यांना ५० टक्के बिल माफ होणार आहे.

२०२३ मार्चपर्यंत थकबाकी ३० टक्के तर २०२४ मार्चपर्यंत २० टक्के सवलत मिळणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी ५० टक्के थकबाकी भरल्यानंतर संबंधित गावातील ग्रामपंचायतीला वसुलीतील ३३ टक्के रकमेचा लाभ होणार आहे. दरम्यान, थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत, बचत गट, सूतगिरणी, साखर कारखाना किंवा सहकारी संस्थांनी सहभाग घेतला तर वसुलीतून त्यांनाही १० टक्क्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

यापुढे अशी होणार वीजजोडणी

शेतकऱ्यांना यापुढे शेती पंपाच्या वीज कनेक्शन जोडणीसाठी लघुदाब वाहिनीपासून ३० मी. अंतरावर असेल तर ३० दिवसांत जोडणी केली जाईल. २०० मीटरपर्यंत ३ महिन्यांच्या आत एबी केबलद्वारे, २०० ते ६०० मीटर अंतर असेल तर एचव्हीडीएस प्रणालीद्वारे स्वतंत्र डीपीमधून तर ६०० मीटर अंतर असेल तर सौरऊर्जेद्वारे वीज कनेक्शन प्रतीक्षा यादीनुसार दिली जाईल. शेतकऱ्यांना तत्काळ जोडणीसाठी मंजूर अंदाजपत्रकानुसार वीज बिलातून परतावा मिळण्याचा पर्याय देखील उपलब्ध ठेवला असल्याचे उपकार्यकारी अभियंता आनंदा पवार यांनी सांगितले.

Web Title: Arrears of Rs 410 crore for agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.