अन् इगोनं केला घोटाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:36 PM2019-11-01T12:36:57+5:302019-11-01T12:37:15+5:30

खºया विजयी भावना प्रेम, माया, आपुलकी याच आहेत. त्यांनीच जर राज्य केलं तरच सगळं सुरळीत, व्यवस्थित राहील. नाहीतर विनाश अटळ आहे !!!

And Igo made a scam! | अन् इगोनं केला घोटाळा !

अन् इगोनं केला घोटाळा !

Next

बरं का मंडळी, एकदा मेंदूला आला खूप कंटाळा ! काहीतरी वेगळं करूया; नेहमीच्या रुटीनने फार बोअर झालंय. काय करावं बरं ? मग त्याने ठरवलं, आपण एक शर्यत लावू या भावनांची !!! सगळ्या भावनांना त्याने एकत्र बोलावलं. माया, प्रेम, वात्सल्य, अनुकंपा, राग, क्रोध, मत्सर, संताप, आत्मसन्मान.. किती किती म्हणून सांगाव्या ? सगळ्या भावना एकत्र जमल्या. का बरं बोलावलं आम्हाला ? मेंदूने उत्तर दिलं मी तुमची एक शर्यत लावणार आहे, स्पर्धा घेणार आहे.   सगळ्यात जास्त शक्तीशाली कोण बनवते माणसाला ? हे पाहायचं आहे मला ! पाहूया कोण जिंकतं ते सगळ्या भावना गोंधळल्या, हा कसला प्रश्न ? ही कसली स्पर्धा ? पण प्रयत्न तर करायलाच हवा, सगळ्याजणी तयारीला लागल्या. स्पर्धा सुरू झाली .. जिंकणार कोण ? तुमचा काय अंदाज, मंडळी ??

मेंदूचा अंदाज बरोबर होता. जिंकलं तर प्रेम, माया, क्षमा, कृतज्ञताच जिंकणार !!! पण..पण, घडलं वेगळंच! प्रेम सगळ्यांना समजावत, बरोबर घेऊन निघालं स्पर्धा जिंकायला. इकडे आत्मसन्मानाच्या मनात वेगळंच चाललं होतं. त्याने प्रेमाला दिला डच्चू ; आणि स्वत:ला जरा फुगवलं, स्वत:चं रूप बदलवलं  गर्वामध्ये!!! आणि एकटाच निघाला स्पर्धा जिंकायला. कोणत्याही परिस्थितीत त्याला जिंकायचंच होतं. त्याने मग राग, द्वेष, मत्सर यांना मदतीला घेतलं, आणि माणसाला एवढा आभास घडवला शक्तीमान, सर्वश्रेष्ठ असल्याचा, की बस्स ! माणूस एकदम खूश !!! इगो सगळ्यात सर्वश्रेष्ठ, इगोने शर्यत जिंकली. निकाल जाहीर झाला. मग काय ? इगोची ताकद खूपच वाढली. तो बाकी सगळ्या भावनांवर कुरघोडी करू लागला. त्याने आपले   साथीदार, मंत्रिमंडळ निवडले. राग, असूया, मत्सर, भीती, क्रौर्य असे सगळेजण सामील झाले त्याच्या मंत्रिमंडळात !

आणि मग झालं काय ? माणूस स्वत:ला परिपूर्ण, सर्वश्रेष्ठ समजू लागला. मीच काय तो जगात सर्वात शहाणा ! मी म्हणेल ते सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, मानलंच पाहिजे असा हट्ट, अट्टाहास सुरू झाला. सल्लागार मंडळ तर होतंच ! जे ऐकत नाहीत, त्यांच्यावर राग, क्रोध, मत्सर सैन्याचा वापर सुरू झाला. भीतीने बाकीच्यांवर दमदाटी करायला सुरू केलं. बाकीचे लोक सुरुवातीला घाबरले. इगोचं  ऐकायला लागले. काहीजण लाच खाऊन गप्प बसले. प्रेम, माया, क्षमा, समभाव, आपुलकी वगैरेंना इगोनं तडीपार केले. तुमची काहीच गरज नाहीये. चलेजाव ! बिचाºया सगळ्याजणी आधी कोपºयात दडून बसल्या. आणि नंतर काढता पाय घेतला. 

इकडे माणसाच्या शरीरात ही या ईगोने हाहाकार माजवला. सगळीकडे कायमच युद्ध परिस्थिती निर्माण करून टाकली. सगळी नको असलेली संप्रेरकं २४ तास ड्यूटीवर राहू लागली. स्नायू सारखेच सतर्क राहू लागले; साखरेने रक्तातच बस्तान बसवले. हृदय धावून धावून थकायला लागले. बाप रे ! सगळी यंत्रणा कोलमडायला लागली. माणूस थकायला लागला. नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, मुलं तर केव्हाच सोडून गेली होती. मदतीची गरज आता भासू लागली. पण बोलावू कुणाला? कसं ? कारण प्रेम, माया, आपुलकी केव्हाचेच निघून गेले होते. गोळ्या, औषधं आली मदतीला ; पण ती ही मदत पुरेनाशी झाली. काय करू ? कसं करू ? 

मेंदूला पश्चाताप झाला. का म्हणून असली स्पर्धा घेतली आपण ? का बरं या इगोला विजेता घोषित केलं आपण ? ते काही नाही आता मलाच मार्ग काढावा लागणार!  काहीतरी करावंच लागेल! त्याने पुन्हा सगळ्या भावनांना एकत्र बोलावलं. मार्ग सुचवायला सांगितलं. सगळ्या भावना पुन्हा एकत्र आल्या. काय करावं ? शेवटी प्रेमाने, आपुलकीने पुढाकार घेतला. क्षमा, कृतज्ञता मदतीला सरसावल्या. इगोला समजावलं. त्यालाही चूक समजली होतीच स्वत:ची ! त्यानेही स्वत:ला पूर्वपदावर आणलं. बराच वेळ गेला या सगळ्यामध्ये. भरपूर पडझड झाली शरीराची, नात्यांची पण, सगळं संपण्यापूर्वी सावरलं गेलं ; हे चांगलं झालं आणि मेंदूने पुन्हा निकाल जाहीर केला खºया विजयी भावना प्रेम, माया, आपुलकी याच आहेत. त्यांनीच जर राज्य केलं तरच सगळं सुरळीत, व्यवस्थित राहील. नाहीतर विनाश अटळ आहे !!!
- प्रा. तात्यासाहेब काटकर,
(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत) 

Web Title: And Igo made a scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.