आमुची मिराशी पंढरी। आमचे घर भीमातीरी।

By Admin | Updated: July 7, 2014 00:55 IST2014-07-07T00:55:21+5:302014-07-07T00:55:21+5:30

पंढरीत तीन लाख भाविक; दर्शनरांग पत्राशेडच्याही पुढे, दर्शनाला आठ तासांचा कालावधी

Amuichi Mirashi Pandhari Our house bhimatiri | आमुची मिराशी पंढरी। आमचे घर भीमातीरी।

आमुची मिराशी पंढरी। आमचे घर भीमातीरी।

 पंढरपूर:
‘आमुची मिराशी पंढरी।
आमुचे घर भीमातीरी।।१।।
पांडुरंग आमुचा पिता।
रखुमाई आमची माता।।२।।
भाऊ पुंडलिक मुनी।
चंद्रभागा आमुची बहीण।।३।।
तुका जुनाट मिराशीं।
ठाव दिला पायांपाशीं।।४।।’
कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनओढीने पंढरीत तीन लाख भाविक दाखल झाले असून, पददर्शन रांग नऊ पत्राशेड भरून पुढे गेली आहे. यामध्ये ८० हजार भाविक दर्शनासाठी थांबले आहेत; तर मुखदर्शन रांगही तुकाराम भवनाच्या पाठीमागे गेली आहे. वाळवंटात दाखल झालेले भाविक हरिजागरात तल्लीन झाले असून, हा सोहळा संपेपर्यंत वारकऱ्यांचे घर असलेल्या भीमातीरावर भक्तीचा सूर निनादणार आहे.
मैलोन्मैल पायी प्रवास करून आलेल्या ज्ञानोबा, तुकोबा, मुक्ताबाई, जनाबाई, सोपानकाका, गोरोबा यासह मानाच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या आहेत, तर ज्ञानेश्वर माऊलींनी टप्पा पार करून पंढरपूर तालुक्याचे स्वागत स्वीकारले. तुकोबाही तालुक्यातील पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी विसावले. खेळ, धावा, रिंगण असा खेळ खेळत पंढरी समीप आल्याच्या आनंदाने ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग’ असे म्हणत वारकऱ्यांनी पंढरीचे आदरातिथ्य स्वीकारत विठुरायाच्या पावन तालुक्यात प्रवेश केला.
पालख्या पंढरीत दाखल होणार असल्याने पालख्यांसोबतचे वारकरी आधीच पंढरपूर गाठून दर्शनासाठी पददर्शन रांगेत थांबत आहेत. एका भाविकाला पददर्शनासाठी आठ ते साडेआठ तास कालावधी लागत असल्याचे हादगाव (ता. केज, जि. बीड) येथील युवराज नामदेव यादव, राणाण्णा संताजी कोंडरू (रा. पिंपळा, ता. बिलोली, जि. नांदेड) यांनी सांगितले.
ज्ञानोबा भंडीशेगाव तर तुकोबा पिराची कुरोली येथील मुक्काम आटोपून सोमवारी वाखरीकडे रिंगण, खेळ, धावा करीत निघणार आहेत. पालख्या पंढरपूर समीप आल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असून, चंद्रभागेत पाणी आल्याने पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी लगबग सुरू झाली आहे.
------------------
आॅनलाइनसाठी ७५ हजार नोंदणी
विठ्ठलाचे झटपट दर्शन घेण्यासाठी ७५ हजार भाविकांनी आॅनलाइन दर्शन नोंदणी केली असून, आतापर्यंत ३0 हजार भाविकांनी याचा लाभ घेतला आहे. रविवारी दिवसभर ६ हजार ५०० भाविकांनी आॅनलाइन दर्शन घेतले. मुख्य तीन दिवसांची नोंदणी फुल्ल झाली असून, यात्रा कालावधीसाठी मंदिर समितीने १ लाख १0 हजार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
चंद्रभागेत नौकाविहार
चंद्रभागा वाळवंटात पाणी आल्याने होड्या पुन्हा सुरू झाल्या असून, भाविकांनी शिणवटा घालविण्यासाठी होडीत बसून चंद्रभागेच्या पात्रात नौकाविहार सुरू केला आहे. यामुळे होडीचालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. स्वच्छतेसाठी शौचालय उभारण्यात आल्याने भाविक चंद्रभागा वाळवंटाचे पावित्र्य राखत आहेत.
घुसखोरी रोखण्यासाठी यंत्रणा
पददर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या भाविकांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांबरोबर स्वयंसेवकांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय लोखंडी बॅरिकेडिंगही दर्शनरांगेला करण्यात आल्याने यंदा घुसखोरीवर आळा बसला आहे.

Web Title: Amuichi Mirashi Pandhari Our house bhimatiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.