साडेआठ कोटी भरल्याने ‘विठ्ठल’ची सर्व खाती जीएसटी विभागाने केली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:20 IST2021-03-14T04:20:54+5:302021-03-14T04:20:54+5:30

कारखान्याच्या सभासदांमध्ये काही मंडळी गैरसमज पसरवित आहेत. याचबरोबर सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात येत असून विठ्ठलच्या सभासदांची सर्व ऊस बिले ...

After paying Rs 8.5 crore, all the accounts of Vitthal were started by the GST department | साडेआठ कोटी भरल्याने ‘विठ्ठल’ची सर्व खाती जीएसटी विभागाने केली सुरू

साडेआठ कोटी भरल्याने ‘विठ्ठल’ची सर्व खाती जीएसटी विभागाने केली सुरू

कारखान्याच्या सभासदांमध्ये काही मंडळी गैरसमज पसरवित आहेत. याचबरोबर सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात येत असून विठ्ठलच्या सभासदांची सर्व ऊस बिले देण्यास कारखाना प्रशासन सक्षम आहे. लवकरच ऊस बिले वाटप सुरू करण्यात येणार असल्याचेही भगीरथ भालके म्हणाले.

सन २०१९-२० गाळप हंगामामध्ये कारखाना सुरु झाला नाही. यामुळे सन २०१८-२०१९ ची जीएसटीची रक्कम‌ थकबाकी राहिली होती. यावर्षीचा गाळप हंगाम सुरु करताना कै. आ. भारत नाना भालके व संचालक मंडळांनी वेळोवेळी पुणे येथील जीएसटी कार्यालयात जाऊन ५ कोटी ८२ लाख भरले आहेत. उर्वरीत रक्कम भरण्यासाठी‌ मुदत घेतली होती.

यावर्षी गाळप हंगामातील सर्व जीएसटी रक्कम कारखान्याने भरली असून मागील थकीत रक्कमेपैकी ८ कोटी ५० लाख भरले आहेत. चेअरमन भगीरथ भालके व संचालक मंडळाने जीएसटी सह. आयुक्तांची भेट घेऊन थकीत रकमेबाबतची तपशीलवार माहिती दिली. यामुळे शुक्रवारी सील‌ केलेली सर्व बॅक खाती सुरु केली आहेत. कै. भारत भालके यांच्या धोरणानुसार कारखान्याचे कामकाज संचालक मंडळ करीत आहे. मागील कोणतीही ऊसबिले थकीत नाहीत. यावर्षीच्या गाळप हंगामातील एफआरपीप्रमाणे ऊस बिलांचे लवकरच वाटप सुरु करणार असल्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी सांगितले.

ऊस बिले मिळण्याचा मार्ग मोकळा

कारखान्याची सर्व खाती सील करण्यात आली होती. शिवाय साखर आयुक्तांनी आरआरसीची कारवाई करत मालमत्ता विकून शेतकऱ्यांची देणी देण्यात यावीत, असा आदेश काढला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र कारखाना प्रशासनाने वेगवान हालचाली करत बंद झालेली खाती सुरू करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कामगार, ट्रॅक्टर मालक, शेतकऱ्यांना त्यांची ऊस बिले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: After paying Rs 8.5 crore, all the accounts of Vitthal were started by the GST department