कार्यकर्ते आता सीसीटीव्हीच्या कक्षेत !
By Admin | Updated: September 4, 2014 00:59 IST2014-09-04T00:59:16+5:302014-09-04T00:59:16+5:30
मंडळांनो सावधान : विसर्जन मिरवणूक मार्गावर कॅमेरे

कार्यकर्ते आता सीसीटीव्हीच्या कक्षेत !
सोलापूर : सुरक्षेच्या दृष्टीने आता सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात असताना पोलीस खात्याने गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर याचा अवलंब करीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना ‘आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात’ असा सल्ला वजा इशारा दिला आहे.
आ. प्रणिती शिंदे यांच्यासह काहींनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे देऊन पोलिसांच्या बंदोबस्ताला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक निघते. विसर्जन मिरवणूक मार्गावर ९ कॅमेरे बसवण्यात आले असून, संवेदनशील भाग समजल्या मौलाली चौकात ४ कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे.
जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वविभाग मध्यवर्ती सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग मोठा आहे. हद्दीत अनेक संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणे आहेत. याचा विचार करून गणपती घाटापर्यंत असणाऱ्या विसर्जन मिरवणूक मार्गावर एकूण २५ कॅमेरे बसवण्यात येत आहे. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूक मार्गावरही २ तर विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या मार्गावर ६ कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
-------------------------
‘व्यापाऱ्यांचे सहकार्य’
विसर्जन मिरवणूक मार्गावर एखादी घटना घडली तर त्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज भासते. मिरवणूक मार्गावर जिथे-जिथे व्यापारी, नागरिकांनी आपल्या घरी कॅमेरे बसवले आहेत. त्या लोकांचे जेलरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एफ. आय. काझी यांंनी आभार मानले आहेत.
आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहोत, याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली तर नक्कीच मिरवणूक शांततेत पार पडणार आहे.
-नीलेश अष्टेकर
पोलीस उपायुक्त