पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात; १ ठार, १३ जण गंभीर जखमी
By Appasaheb.patil | Updated: December 21, 2023 14:19 IST2023-12-21T14:19:09+5:302023-12-21T14:19:14+5:30
या अपघातात जयजयराम काशीराम शिंदे ( वय-३५ दाताळा तालुका सेनगाव) यांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या टेम्पोचा अपघात; १ ठार, १३ जण गंभीर जखमी
लक्ष्मण कांबळे/कुर्डूवाडी
हिंगोली जिल्ह्यातून पंढरपूरात देवाच्या ठिकाणी घरातील एका व्यक्तीच्या असलेल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी वरूड (ता.शेनगाव) येथून एका खाजगी टेम्पोतून प्रवास करत असतानाच बावी (ता.माढा जि. सोलापूर) येथील सिध्देश्वर मंदिराजवळ पोहचली असता चालकाला लागलेल्या डुलकीमुळे गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने त्यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल १३ जण यात जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातात जयजयराम काशीराम शिंदे ( वय-३५ दाताळा तालुका सेनगाव) यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे सदरचे घटना घडल्यानंतर अपघातातील एका जखमी व्यक्तीने १०८ या क्रमांकावर संपर्क साधला. त्यामुळे शेटफळ व कुर्डूवाडी येथील ॲम्बुलन्स घटनास्थळावरती अर्ध्या तासात पोहोच झाल्या. त्यातून जखमींना कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. त्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, डॉ प्रद्युम्न सातव यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यातील काहीजण गंभीर जखमी असल्याने त्यांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले.
या घटनास्थळाला कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांनी भेट देऊन पाहणी केली.यात जखमी अर्चना केळे ( वय २२ रा.जानरुण रोडगे), देहुबाई ज्ञानोबा दरोगे (वय ५० रा.दाताळा ता.सेनगाव), प्रभावती जयजयराम शिंदे (वय ३० दाताळा ता.सेनगाव), कानबा अंबर दरोगे (वय ६० रा.दाताळा ता.सेनगाव), ज्ञानेश्वर विठ्ठल केळे (वय २७ रा.जानरुण रोडगे), भास्कर गेनुजी गाडे (वय ४० रिधोरा ता.सेनगाव), सुधाकर दाजिबा कोटकर (वय ५० वरुड ता.सेनगाव), सरस्वती गजानन शिंदे( वय ३० रा.दाताळा ता.सेनगाव), रूक्मिणी विठ्ठल केळे (रा.कंकरवाडी ता.सेनगाव), चंद्रभागा संतोष नलवडे (वय ३४ तरडगाव ता.सेनगाव), प्रयागाबाई संजय सरकटे (वय ४० रा.समगा ता.सेनगाव), गजानन कौतिका शिंदे (वय ३६ रा.दाताळा ता.सेनगाव) अशी आहेत.