Solapur Crime : म्हैसगाव (ता.माढा) येथे घरातून सकाळी शाळेला जाताना पाठीमागून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने एका आठवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रणव बालाजी सुरवसे (वय १४, रा. म्हैसगाव) याचा मृत्यू झाला. याबाबत त्याचा चुलत भाऊ अभिजित तानाजी सुरवसे (वय २१, रा. म्हैसगाव,) याने फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी समाधान संपत वसेकर (रा. म्हैसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणव बालाजी सुरवसे हा त्याच्या राहत्या घरापासून गावातील मातोश्री कन्या प्रशालेकडे जात होता. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गावातीलच वसंतराव नाईक विद्यालय समोरील रोडवर आला असता एका ट्रॅक्टरने ठोकरल्याने त्याचा मृत्यू झाला.
प्रणवच्या वडिलाचे महिन्यापूर्वी निधनप्रणव घरात एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन मोठ्या बहिणी असून त्यातील एकीचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. तर दुसरीही त्याच शाळेत इयत्ता दहावीला यंदा शिक्षण घेत होती. परंतु तिची परीक्षा नुकतीच संपल्याने ती त्याच्यासोबत शाळेला आली नव्हती. त्याचबरोबर त्याच्या वडिलांचेही एका दुर्धर आजाराने महिन्यापूर्वीच निधन झाले आहे.