मंदिर परिसरात उत्खनन करताना दगडी बांधकामाच्या खोलीत आढळला मानवी सांगाडा
By विठ्ठल खेळगी | Updated: March 9, 2023 17:20 IST2023-03-09T17:20:19+5:302023-03-09T17:20:42+5:30
आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या संपादित क्षेत्रात जगदंबा देवीचे मंदिर पुनरोपण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मंदिर परिसरात उत्खनन करताना दगडी बांधकामाच्या खोलीत आढळला मानवी सांगाडा
सोलापूर/मोहोळ : आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या संपादित क्षेत्रात जगदंबा देवीचे मंदिर पुनरोपण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महमार्गाच्या पुलाचे काम चालू असताना मंदिर परिसरात उत्खनन करत असताना जमिनीखाली एका समाधीच्या खाली दगडी बांधकामाच्या खोलीत मानवी सांगाडा आढळून आला आहे. त्यामुळे सदरचा मानवी सांगाडा हा प्राचीन काळातील आहे की, याची चर्चा परिसरात होत होती.
बुधवार, दि. ८ मार्च रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली मंदिराच्या परिसरातील उत्खनन करत असताना दगडी बांधकामाच्या खोलीमध्ये एक मानवी शरीराचा सांगाडा आढळला. यानंतर पुरातत्त्व विभागाच्या वतीने सांगड्याचे संशोधन सुरू करण्यात आले आहे. बुधवारी दिवसभर मंदिर परिसरात उत्खनन करत असताना ग्रामस्थांनी दिवसभर गर्दी केली होती. उत्खननाचे काम संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. काम अपूर्ण राहिल्याने गुरुवारी पुन्हा त्या ठिकाणी उर्वरित उत्खनन करण्यात येणार आहे.
मातीचा डेराही सापडला
महामार्गाच्या संपादित क्षेत्रात देवीचे मंदिर आल्याने पुरातत्त्व विभागाच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली जगदंबा देवीचे मंदिर मूळ ठिकाणाहून पाडून मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे. आठ मार्च रोजी दिवसभर ‘त्या’ समाधीखाली उत्खनन चालू होते. उत्खननादरम्यान सापडलेला मातीचा डेरा व मानवी सांगाडा आढळून आला आहे. त्यामुळे प्राचीन जगदंबा मंदिराच्या संपूर्ण परिसरात शास्त्रीय पद्धतीने उत्खनन व संशोधन करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने जोर धरत आहे. सदर ठिकाणी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी भेट दिली.