पंढरपूर : बहिणीच्या लग्नासाठी घेतलेले हातउसने पैसे परत न दिल्याने मित्रानेच मित्राच्या डोक्यात बीअरची बाटली फोडून जखमी करण्याचा प्रकार पंढरपूर शहरात मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडला.
पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, विष्णू चांगदेव साठे (वय २४, रा. व्यास नारायण झोपडपट्टी, पंढरपूर) याने त्याचा मित्र विक्रांत संजय अभंगराव (रा. अंबाबाई पटागंण, पंढरपूर) याच्याकडून बहिणीच्या लग्नासाठी हातउसने पाच हजार रुपये घेतले होते. ते पैसे आठवड्याला थोडे थोडे द्यायचे ठरले होते. त्यानुसार विष्णू आठवड्याला थोडे थोडे पैसे देत होता. परंतु, या चालू आठवड्यात त्याला पैसे देणे जमले नाही. यानंतर विक्रमने विष्णूला फोन करून नवीन पुलाजवळ अंबाबाई पटांगण येथे बोलावून घेऊन पैसे मागितले. विष्णूने त्याला पैसे नसल्याचे सांगत उद्या दुपारपर्यंत पैसे देतो, असे सांगितले. यानंतर विक्रमने विष्णूला शिवीगाळ केली. पैसे न दिल्याच्या कारणावरून जमिनीवर पडलेल्या बीअरच्या काचेच्या बाटल्या उचलून त्याच्या डोक्यावर मारून फोडल्या.
दरम्यान, याबाबत शहर पोलिस ठाण्यात विष्णू साठे यांनी फिर्याद दिली आहे.