आषाढीसाठी पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत, ३६ बोअरवेल, ५० हातपंप निश्चित
By Appasaheb.patil | Updated: June 1, 2023 13:09 IST2023-06-01T13:08:59+5:302023-06-01T13:09:50+5:30
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यात पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत व टॅकर भरण्यासाठी १२ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

आषाढीसाठी पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत, ३६ बोअरवेल, ५० हातपंप निश्चित
सोलापूर : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यात पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत व टॅकर भरण्यासाठी १२ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच आषाढी यात्रा कालावधीसाठी मुबलक पाणी पुरवठा यासाठी पंढरपूर शहर व परिसरात ३६ बोअरवेल, ५० हातपंप, टॅकर भरण्यासाठी दोन ठिकाणे व ६५ एकर येथील पाणीपुरवठा व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज तसेच अन्य संताच्या पालख्याबरोबर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक येतात. पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहरात व परिसरात स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी पालखी मार्गावरील तसेच शहरातील पाणीपुवठा करणाऱ्या जल स्त्रोतांची तपासणी करावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या आहेत.
रस्ता दुरूस्ती..वीज अखंडित ठेवण्याच्याही सूचना
ठिकाणच्या जलस्त्रोतांची तपासणी करावी तसेच ज्या ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य अशा ठिकाणी ठळक माहिती फलक लावावेत. पालखी मार्गावरील टँकर भरण्याच्या ठिकाणी कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी रस्ता दुरुस्ती करावी. महावितरण विभागाने पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या स्त्रोतांचा विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही यांची दक्षता घ्यावी. पाण्यात क्लोरिनचे योग्य प्रमाण राहिल याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, असेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.