पंढरपुरात परिचारकांचा ७/१२ चा नारा
By Admin | Updated: February 24, 2017 18:36 IST2017-02-24T18:36:25+5:302017-02-24T18:36:25+5:30
पं़ स़ एकहाती सत्ता : भाजपचे कमळ फुलले

पंढरपुरात परिचारकांचा ७/१२ चा नारा
पंढरपुरात परिचारकांचा ७/१२ चा नारा
प्रभू पुजारी - आॅनलाइन लोकमत पंढरपूर
पंढरपूर तालुक्यात आ़ प्रशांत परिचारक यांनी भाजप, पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडी आणि शिवसेना अशी आघाडी करून जि़ प़ आणि पं़ स़ ची निवडणूक लढविली होती़ यामध्ये त्यांच्या या आघाडीला जि़ प़ च्या ८ पैकी ७ जागा तर पं़ स़ च्या १६ पैकी १२ जागा मिळाल्या आहेत़ त्यामुळे परिचारक गटाचा ७/१२ नारा यशस्वी झाला आहे़ शिवाय पंढरपूर पं़ स़ वर एकहाती सत्ता मिळविण्यात यश आले आहे़ पंढरपूर तालुक्यात प्रथम कमळ फुलले आहे़ भाजपाला जि़ प़ च्या ८ पैकी ४ तर पं़ स़ च्या १६ पैकी ७ जागांवर यश मिळवता आले आहे़ पंढरपूर तालुक्यात जवळपास निम्म्या जागा या भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत़
पंढरपूर तालुक्यात पांडुरंग आणि विठ्ठल परिवारातच काट्याची टक्कर होत असते़यावेळी पांडुरंग परिवाराने भाजपा आणि शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढविली होती़ भालके-काळे-पाटील-महाडिक गटाने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भीमा परिवार यांची मोट बांधून निवडणूक लढविली़ तरीही त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही़ केवळ जि़ प़ च्या एका आणि पं़ स़ च्या चार जागांवर समाधान मानावे लागले़
स़ शि़ वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन वसंतराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांना पिराची कुरोली पं़ स़ गणातून पराभव स्वीकारावा लागला़ तसेच कल्याणराव काळे यांना हक्काचा भाळवणी गट राखण्यात अपयश आले़ तसेच आ़ भारत भालके यांना कासेगाव जि़ प़ गटासह कासेगाव गण आणि स्वत:चे गाव असलेले सरकोली पं़ स़ गणही ही राखता आला नाही़ राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांना मात्र भोसे जि़ प़ गट आणि गण हे दोन्ही स्वत:कडे खेचून आणण्यात यश आले़ या ठिकाणी त्यांचे वर्चस्व असल्याचे निकालावरून दिसून आले़ रोपळे जि़ प़ गटात बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन हळणवर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले़
या निवडणुकीत करकंब जि़ प़ गटातील पं़ मं़ विकास आघाडीच्या उमेदवार रजनी देशमुख या तब्बल १५ हजार ७४७ मते घेऊन तालुक्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या तर पं़ मं़ विकास आघाडीचे वसंतराव देशमुख आणि काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात अटीतटीची टक्कर होऊन केवळ सर्वाधिक कमी म्हणजेच ३२५ मतांनी देशमुख विजयी झाले़ पं़ स़ निवडणुकीत उंबरे गणातील पं़ मं़ विकास आघाडीच्या अर्चना व्हरगर यांना ६ हजार ६२० ही सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्या़ तसेच गुरसाळे पं़ स़ गणातील भाजपचे उमेदवार राजेंद्र पाटील हे ३ हजार ३८७ मते घेऊन विजयी झाले़
-----------------------------
निवडणूक मॅरेथॉनमध्ये आमदार पुत्राचा पराभव
कासेगाव जि़ प़ गटात आ़ भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके आणि पांडुरंग साखर कारखान्याचे व्हा़ चेअरमन वसंतराव देशमुख यांच्यात आज निवडणुकीच्या निकालानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा पाहायला मिळाली़ वसंतराव देशमुख हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते़ शेवटी शेवटी भगीरथ भालके हे त्यांना मागे टाकून पुढे जातील, असे वाटत होते़ कारण देशमुख त्यांचे मताधिक्य कमी कमी होत होते; मात्र भगीरथ भालके शेवटपर्यंत पुढे जाऊ शकले नाहीत़ अखेर ही निवडणुकीची मॅरेथॉन स्पर्धा वसंतराव देशमुख यांनी ३२५ मतांनी जिंकली आणि आ़ भारत भालके यांच्या चिरंजीवांना हार पत्करावी लागली़
------------------------
पक्षीय बलाबल
जि़ प़ गट : भाजप ४, पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडी ३, राष्ट्रवादी १़
पं़ स़ गण : भाजप ७, पं़-मं़ विकास आघाडी ४, शिवसेना १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १, भीमा परिवार १