कर्नाटकात जाणारा २०० पोती युरिया जप्त
By Admin | Updated: September 19, 2014 23:34 IST2014-09-19T23:34:34+5:302014-09-19T23:34:34+5:30
कृषी विभागाची कारवाई : आठवड्यात तीन ट्रक खत कर्नाटकात

कर्नाटकात जाणारा २०० पोती युरिया जप्त
सांगली : जिल्ह्याच्या वाट्याचे दोनशे पोती युरिया आणि ८० किलो १८:१८:१८ विद्राव्य खत एका मुख्य खत विक्रेत्याच्या माध्यमातून कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच ४३/ई५८९६) जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खटाव (ता. मिरज) येथे पकडला. यातील सर्व खत कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील गोदामामध्ये ठेवले असून, विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात तीन ट्रक खत कर्नाटकामध्ये गेल्याची कबुलीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुख्य विक्रेत्यांच्या खताच्या काळ्याबाजारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया, डीएपी खताच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
(एमएच ४३/ई५८९६) या क्रमांकाच्या ट्रकमध्ये चालकाने सांगलीतील रेल्वेस्थानकावरून दोनशे पोती युरिया व ८० किलो १८:१८:१८ विद्राव्य खत भरले होते. या ट्रक चालकाकडे खटाव येथील न्यू सोमेश्वर कृषी सेवा केंद्रासाठी खत देण्याचे बिल होते. खटावमध्ये ट्रक गेल्यानंतर सोमेश्वर कृषी सेवा केंद्राच्या मालकांनी संबंधित खत आमचे नसल्याचे सांगितले. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कल्पना दिली. यावेळी कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले यांनी संबंधित कृषी सेवा केंद्रचालकास ट्रक तेथेच थांबवून ठेवण्याची सूचना दिली. त्यानंतर संबंधित ट्रकचालकाची आणि खताची तपासणी कृषी विकास अधिकारी भोसले, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी डी. एस. शिंगे, ए. ए. बारवकर आदींनी केली. यावेळी संबंधित खत कर्नाटकात जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने ते खत कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामात ठेवण्यात आले. या सर्व खताला विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कृषी विकास अधिकारी भोसले म्हणाले की, या कृषी सेवा केंद्राचे बोगस बिल करून दहा टन खत घेऊन खटाव येथे ट्रक गेला होता. प्रत्यक्षात हेही खत कर्नाटकातच जात असण्याची शक्यता आहे. म्हणून संबंधित खत पाठविणारे मुख्य विक्रेते वरद कृषी सेवा केंद्र येथील व्यवस्थापकांचा जबाब घेतला जात आहे. मागील आठवड्यात याच पध्दतीने दोन ते तीन ट्रक खत कर्नाटकात गेले असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सीमाभागात कशा पध्दतीने खत जात आहे, याची तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)